बिहारमध्ये दारूबंदी असतानाही अनेकदा सर्रास दारूच्या पार्ट्या होत असल्याची छायाचित्रे येत असतात. त्यामुळे सरकारकडून केले जाणारे तमाम दावे आणि प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. बिहारमध्ये डॉक्टर मद्यपार्टी करत असल्याचे छायाचित्र आता समोर आले आहे. जन अधिकार पक्षाचे सर्वेसर्वा पप्पू यादव यांनी या दारूपार्टीचे छायाचित्र पोस्ट करून बिहार सरकारला लक्ष्य केले आहे.
‘बिहारमध्ये गरिबांसाठी दारूबंदीचा वेगळा कायदा आहे आणि डीएमसीएचचे प्राचार्य आणि डॉक्टरांसाठी वेगळा कायदा आहे का? दरभंगामध्ये पेडिकॉन परिषदेत दारू वाटली जात होती. डॉक्टर याची मजा लुटत होते. सरकार झोपले होते. हे कधीपर्यंत चालणार आहे? मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याकडे लक्ष द्यावे,’ असे पप्पू यादव यांनी लिहिले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर रोजी डीएमसीएचच्या गेस्ट हाऊसमध्ये दारूपार्टी सुरू होती.
हे ही वाचा:
३० डिसेंबर रोजी श्रीराम विमानतळ अन् अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन
संसद हल्लाप्रकरणी महेश कुमावतला दिल्ली पोलिसांकडून अटक
अभिनेता अल्लू अर्जुनने दारू, पान मसाला ब्रँडची जाहिरात नाकारली
१४, १५ आणि १६ डिसेंबर रोजी दरभंगा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातर्फे पेडिकॉन-२०२३ (डॉक्टर परिषद)चे आयोजन करण्यात आले होते. यात बिहारसह अन्य राज्यांतील डॉक्टरही सहभागी झाले होते. व्हायरल झालेल्या या छायाचित्रात डीएमसीएचचे प्राचार्य डॉ. के. एन. मिश्रा हेदेखील दिसत आहेत. याबाबतचे छायाचित्र आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर दरभंगा पोलिस जागे झाले. या घटनेचा व्हिडीओ समोर येताच डीएमसीएच परिसरात पोलिसांनी छापे मारले. यावेळी परदेशी मद्याच्या तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या. पुराव्यांचा तपास करून संबंधितांची चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.