सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या अंतर्गत नव्या संसदभवनाच्या छतावर बसविण्यात आलेले अशोक स्तंभावरील सिंहावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. हे सिंह क्रूर दिसतात, असा आक्षेप या याचिकेत घेण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
न्यायालयाने यासंदर्भात टिप्पणी केली की, अशोक स्तंभवर दिसणाऱ्या सिंहाकडे पाहता त्यातून कोणत्याही नियमांचा भंग वगैरे होत नाही. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलाने म्हटले की, यातील सिंह हे अधिक आक्रमक दिसत आहेत. त्यावर न्यायाधीश म्हणाले की, हे बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून आहे.
ही याचिका शुक्रवारी न्यायाधीश एमआर शहा आणि न्या. कृष्ण मुरारी यांच्या पीठासमोर आली होती. याचिकाकर्त्यांचे वकील अलदानिश रेन यांनी युक्तिवाद केला की, या राष्ट्रीय प्रतिकावर सत्यमेव जयते हे लिहिण्यात आलेले नाही. यातून राष्ट्रीय चिन्हाचा अवमान होतो.
हे ही वाचा:
काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच
नवरात्र २०२२ : कामाख्या मंदिराचे तेजच निराळे
देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे
मुंबई विमानतळावर महिलेकडून कोकेन जप्त
या सिंहाच्या मुद्रेवरून विरोधी पक्षांनी आवाज उठविला होता. विरोधी पक्षांचे म्हणणे होते की, सिंहाच्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. त्यावर केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी प्रत्युत्तर दिले होते. पुरी यांनी म्हटले होते की, मूळ प्रतिक हे १.६ मीटर उंच आहे तर संसद भवनावर असलेले हे प्रतीक ६.५ मीटर उंच आहे.
सेंट्रल व्हिस्टा या प्रकल्पावरून विरोधकांनी जाणीवपूर्वक बभ्रा केला होता. याचा खर्च अधिक आहे, कोरोनाच्या काळात कशाला हवे बांधकाम वगैरे आक्षेप घेण्यात आले. पण आता हा प्रकल्प उभा राहिला आहे. त्यावेळीही या प्रकल्पाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावरून न्यायालयाने याचिकादारांना एक लाखाचा दंडही केला होता.