ओदिशामध्ये शनिवारी दोन तासांत तब्बल ६१ हजार वेळा विजा कडाडल्या. त्यामुळे १२ जण मृत्युमुखी तर १४ जण जखमी झाल्याची घटना घडली. विशेष मदत विभागाचे आयुक्त सत्यप्रभा साहू यांनी ही माहिती दिली. ७ सप्टेंबरपर्यंत हवामान वाईट असेल, असे भाकीत भारतीय हवामान विभागाने वर्तवले असल्याने विजा कडाडण्याच्या आणखी घटना घडू शकतात, अशी माहिती त्यांनी दिली.
बंगालच्या उपसागरात सक्रिय असलेले चक्रीवादळ पुढील ४८ तासांत कमी दाबाच्या क्षेत्रात तीव्र होऊ शकते आणि त्याच्या प्रभावाखाली ओदिशामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या शेवटी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये ७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
शनिवारी वीज कोसळून मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये खुर्दा जिल्ह्यातील चौघे, बालंगीर आणि अंगुल जिल्ह्यात प्रत्येकी दोन; तर, बौध, ढेंकनाल, गजपती, जगतसिंगपूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तसेच, गजपती आणि कंधमाल जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने आठ गुरांचाही मृत्यू झाला.
‘मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येकी चार लाख रुपये अनुदान दिले जाईल,’ असे साहू यांनी सांगितले. हवामान शास्त्रज्ञांनी विजांचा हा कडकडाट असामान्य होता, असे सांगितले. जेव्हा मान्सून दीर्घ विश्रांतीनंतर सामान्य स्थितीत परत येतो तेव्हा अशा घडामोडी होतात. थंड आणि उबदार हवेच्या वस्तुमानांची टक्कर अशा अभूतपूर्व विजेच्या घटनांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करते, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा:
पवईत एअर होस्टेसची हत्या, फ्लॅटमध्ये मिळाला मृतदेह
‘सनातन धर्म मिटवा’ म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यास बंदी घाला
बलात्कारी, मारेकरी मुलाविरुद्ध आईनेच साक्ष दिली; झाली जन्मठेपेची शिक्षा
पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात रॉकेटला गती
‘दीर्घकाळ पाऊस न पडल्यामुळे वातावरण तापले आहे आणि आर्द्रतेचे प्रमाण जास्त आहे. दोन दिवसांच्या सततच्या पावसानंतर, विजेची तीव्रता कमी होईल,’ असे भुवनेश्वरमधील हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्रातील हवामान शास्त्रज्ञ उमा शंकर दास यांनी सांगितले.