शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण कशाला हवे?

शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण कशाला हवे?

गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शाळा सुरू करण्यासाठी अद्यापही सरकारकडून कोणत्याही हालचाली केल्या जात नाहीयेत. पण आता देशातील शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी करणारे पत्र देशातील डॉक्टर, शिक्षणतज्ज्ञ आणि नामवंत अशा ५६ जणांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्री, प्रशासनाला लिहिले आहे. पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनाही पत्र लिहिण्यात आले आहे.

शाळा सुरू करण्यासाठी लसीकरण ही अट असू नये, असे पत्रात म्हटले आहे. मुलांना तातडीने शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याने प्राथमिक शाळेपासून सुरुवात करावी आणि नंतर वरच्या वर्गांचा विचार करावा, असेही पत्रात म्हटले आहे.

जागतिक उदाहरणेही शाळा सुरू करण्याच्या बाजूने आहेत. जगभरातील केवळ चार ते पाच देश असे आहेत जिथे इतक्या काळासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व पक्षीय नेत्यांनी या विषयावर एकत्र येण्याची गरज आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

हे ही वाचा:

मोनिकाच्या हाताच्या स्पर्शातून त्यांना जाणवले मुलाचे अस्तित्व

माझ्या पप्पांचा पगार द्या! वेतन नसलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या मुलीची आर्त हाक

गजाआड! करत होते अल्पवयीन मुलीचा ऑनलाईन लैंगिक छळ

यंदा विमान तिकीट आरक्षणाची गगनाला गवसणी!

मुलांना संसर्गाचा धोका कमी आहे. त्यामुळे लसीकरणातून त्यांना मिळणारे लाभही कमी आहेत, असे मत पत्रात मांडले आहे. शाळा सुरू नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतच आहे, शिवाय मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहेत. त्यामुळे धोक्यावर मात करून शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी पत्रातून केली आहे.

साथरोग शास्त्रज्ञ चंद्रकांत लहरिया, इंडियन असोसिएशन ऑफ प्रीवेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लॅन्सेट कमिशन कोविड- १९ इंडिया टास्क फोर्सच्या सदस्य सुनीला गर्ग, इंडियन अकादमी ऑफ पेडियाट्रिक्सचे माजी अध्यक्ष नवीन ठाकर आणि टीच फॉर इंडियाचे सीईओ शाहीन मिस्त्री यांचा पत्र लिहिणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

Exit mobile version