एसटी महामंडळ वेगवेगळ्या कारणांनी सध्या चर्चेत आहे. कुठे एसटीवर कर्जाचा बोजा तर कुठे कर्मचाऱ्यांना वेतनच नाही. आता एका पत्रामुळे एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.
या पत्रात वाहतूक नियंत्रक राजेंद्र बंगाले या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर त्याच्या सुट्ट्यांचे पैसे देण्याचे पत्र काढण्यात आले आहे. पण त्या पत्रात सदर कर्मचाऱ्याचे निधन झाल्याचे प्रसिद्ध करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही व्यक्ती जिवंत असून केवळ निवृत्त झाल्यानंतर त्याला महामंडळाकडून सुट्ट्यांचे पैसे येणे आहे. मात्र ते देतानाच्या पत्रात सदर व्यक्ती निधन पावल्याचे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून ही गंभीर बाब असल्यामुळे संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नागपूरने हे पत्र काढले आहे. त्यात अंतिम शिल्लक रजा रोखीकरण या मथळ्याखाली हे पत्र लिहिण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, खालील दर्शविलेले प्रशासकीय कर्मचारी रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविलेल्या तारखेपासून दुःखद निधन झालेले आहेत. त्यांच्या खात्यात शिल्लक असलेल्या अंतिम अर्जित रजेचे मध्यवर्ती कार्यालयाचे परिपत्रक क्र. ११/२०१२ दि. १०-०७-२०१२ मधील तरतुदीनुसार (रकाना क्र. ७मध्ये दर्शविलेल्या एकूण दिवसांचे) अंतिम अंकेक्षणाअंती रोखीकरण करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
आज काबुलकडून दिल्लीला येणार शेवटचे विमान
म्हणून विराटची ऑडी आहे पोलिसांच्या ताब्यात
लाचखोर वैशाली झनकर पोलिस कोठडीतच
अहमदाबादमध्ये उभा राहणार टाटा मोटर्सचा स्क्रॅपेज कारखाना
नागपूरच्या विभाग नियंत्रकांनी त्यावर स्वाक्षरीही केली आहे. ज्या व्यक्तीने हे पत्र तयार केले आहे त्याने याआधीच्या कुठल्यातरी पत्रातील मजकूर तसाच कॉपी करून या पत्रात डकवला आहे, असे स्पष्ट दिसते आहे. शिवाय, संबंधितांनी त्यावर स्वाक्षरी करताना मजकुरात एवढी गंभीर चूक आहे हे पाहिलेले नाही, हेदेखील यातून स्पष्ट होते.