मानवी वस्तीच्या २०३ मीटर अंतरावर बिबट्याच्या गुहेची कल्पना करा. कल्पना करा की, मानव शेती करतो, त्या जागेपासून ३० मीटर अंतरावर एक बिबट्या नवजात शावकांसह राहात आहे. मुंबईतील बिबट्या शहराच्या परिसरात माणसांसोबत राहायला शिकले आहेत. त्यामुळे हे वास्तवातही होऊ शकते.
गेल्या दोन वर्षांत मुंबईत पहिल्याच रेडिओ टेलीमेट्री प्रकल्पाद्वारे याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पामध्ये पाच बिबट्यांना रेडिओ-कॉलर करण्यात आले होते आणि त्यांच्या हालचालींचा जीपीएसद्वारे मागोवा घेण्यात आला होता. या अभ्यासात उद्यानाच्या परिसरात राहणारे दोन नर बिबट्या (महाराजा आणि जीवन) आणि तीन मादी (सावित्री, क्रांती आणि तुळशी) यांचा समावेश होता. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
बुधवारी आंतरराष्ट्रीय बिबट्या दिनी प्रसिद्ध झालेल्या ‘नागरी बिबट्यांची वृत्ती आणि लोकांशी त्यांचा संवाद’, या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. ६ जून २०२२ रोजी क्रांती ही मादी बिबट्या मानवाने मागावर ठेवलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झाली. एका मिनिटात परतताना तिचे पुन्हे छायाचित्र काढण्यात आले. दुसऱ्या छायाचित्रात तिथे दोन पुरुषही होते. क्रांतीने कदाचित तिथे मानव आहेत, हे जाणून तेथून पलायन केले असावे, असे निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे. ‘आम्ही तुलसी सोबत असेच एक उदाहरण पाहिले. ती मानवी वस्तीच्या २० मीटरच्या आत असताना कचऱ्याच्या जागेवर तिचा पाळीव कुत्र्याने पाठलाग केला,’असे संशोधक सांगतात.
अभ्यासाचे प्रारंभिक निष्कर्ष असे सूचित करतात की, कॉलर लावलेले बिबट्या रात्रीच्या वेळी मानवी वर्चस्व असलेल्या भागात वारंवार भेट देतात. “आम्ही दिवसभरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या मुख्य भागात बिबट्या विश्रांती घेत असल्याचे पाहिले. तथापि, मानवांची वर्दळ कमी असताना या कॉलर आयडी लावलेल्या बिबट्यांनी मानवांचा वावर असलेल्या ठिकाणांना भेट दिली,’ असे या प्रकल्पाच्या प्रमुख संशोधकांपैकी एक असलेल्या निखित सुर्वे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, बिबट्यांच्या अधिवासात मानवाने आक्रमण केले असले तरी ते त्यांच्यासोबत राहात आहेत. १०४ चौ. किमीच्या उद्यानात किमान ४५ बिबट्या असल्याचा वन अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. जीपीएस पॉईंट्सचा मागोवा घेतल्यावर महाराज या बिबट्याने चिंचोटी-भिवंडी रस्ता आणि वसई-पनवेल रेल्वे मार्ग सहावेळा ओलांडल्याचे दिसून येते. जवळपास काही अंडरपास असूनही, वाहनांची वर्दळ कमी असताना त्याने रस्ता ओलांडून जाणे पसंत केले.
हे ही वाचा:
‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर
सर्बियात १३ वर्षांच्या मुलाने शाळेत आठ मुलांना घातल्या गोळ्या
अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराची आणखी एक घटना; एक ठार
आता घरी बसून पार्किंगची जागा ठरवा
दुसरा नर बिबट्या १५ वेळा वर्दळीचा घोडबंदर रस्ता ओलांडताना आढळून आला. अधूनमधून तो रस्त्याच्या कडेला बसला होता, असे त्याने भेट दिलेल्या ठिकाणांवरून दिसून आले आहे. तो रस्ता ओलांडण्यापूर्वी रस्त्याचे निरीक्षण करत होता. येथे घोडबंदर रोड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प नियोजित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे कोणतेही अपघात होणार नाहीत, यासंदर्भातील उपाययोजना करण्यासाठी या बिबट्यांच्या हालचालीची मदत होणार आहे.
बिबट्याच्या आहारात घरगुती शिकारीचे सर्वात मोठे योगदान आहे. या अभ्यासात त्यांच्या ९७ खाण्याच्या घटनांची नोंदी झाली. त्यांचा ७९ टक्के आहार हे कुत्रे, मांजर, शेळ्या, डुक्कर, बदके आणि पक्षी यांचा होता. बिबट्या सर्वसधारणपणे ठिपकेदार हरीण, सांबर, लंगूर, जंगली डुक्कर, काळ्या रंगाचे ससे आणि पक्षी खातात. त्यामुळे बिबट्याला दूर ठेवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मानवी परिसर स्वच्छ ठेवणे, हा आहे, असे अहवालात म्हटले आहे.