गोरेगाव येथे बिबट्यांचा वावर निवासी संकुलांजवळ असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. फिल्मसिटीतही बिबट्याचा संचार असल्याचे अनेक वर्षे बोलले जात आहे, त्याविषयीची भीती व्यक्त केली जात आहे. पण अजूनही त्यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. सोमवारी सकाळी बिबट्याने फिल्मसिटीतील एका कुत्र्याचा मारल्याचे समोर आले आणि पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
फिल्मसिटी, गोरेगाव, मुंबई येथे सोमवारी सकाळी पावणेदहा वाजता ‘अजूनी’ या हिंदी मालिकेच्या सेटवर शूटिंग सुरू असताना एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला. त्याने कुत्र्याला मारून खाल्ले. या प्रकारामुळे फिल्मसिटीमध्ये खळबळ उडाली असून तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनच्या सदस्यांनी अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता यांच्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. बिबट्याने हल्ला केला तेव्हा सेटवर सुमारे ३०० जण उपस्थित होते, या सर्वांचा जीव धोक्यात होता.
एआयसीडब्ल्यूएच्या अध्यक्षांनी अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला असून त्यांच्या माध्यमातून हा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेतही मांडण्यात आला आहे, असे हल्ले वारंवार होत आहेत पण सरकारकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. संपूर्ण फिल्मसिटीमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू आहे. कलाकार, मजूर सगळेच भीतीच्या छायेखाली आहेत. यासंदर्भात राजकीय पक्षांकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही यासंदर्भात लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली आहे.
फिल्मसिटीमध्ये अनेकप्रकारेच शूटिंग नियमित सुरू असते. तिथे रात्रीही शूटिंगची कामे चालतात. अनेक ठिकाणी अंधार असल्यामुळे तिथे बिबट्या हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. काहीवेळेला फिल्मसिटीत शूटिंगमध्ये प्राण्यांचा वापरही केला जातो. त्या प्राण्यांवर हल्ला करण्यासाठी बिबटा तिथे येऊ शकतो.
सोमवारी झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल झाले असून त्यात बिबट्या शूटिंगच्या ठिकाणी असलेल्या सामानावरून उड्या मारत चालल्याचे दिसते आहे. तसेच त्याने मारलेल्या कुत्र्याचा मृतदेहदेखील दिसत आहे. त्यामुळे कर्मचारी, कलाकार यांच्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.