दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) आयोजित केलेली काही व्याख्याने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इराण, पॅलेस्टाईन आणि लेबेनॉन या देशांच्या भारतातील राजदूतांचे व्याख्यान विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या भागातील युद्ध परिस्थितीवर व्याख्यानात प्रकाश टाकण्यात येणार होता. मात्र, इराणच्या राजदूतांचे नियोजित व्याख्यान विद्यापीठाकडून अचानक पुढे ढकलण्यात आले, तर लेबेनॉन आणि पॅलेस्टाईन या देशांच्या भारतातील राजदूतांचे व्याख्यान रद्द करण्यात आले आहे. यासंबंधीचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.
पश्चिम आशियात सध्या युद्धाचे गडद ढग जमले असून तेथील इराण, पॅलेस्टाईन आणि लेबेनॉन यांचा इस्रायलशी संघर्ष सुरू आहे. याचं पार्श्वभूमीवर जेएनयू विद्यापीठाच्या पश्चिम आशिया अभ्यास केंद्राकडून काही व्याख्याने ठेवण्यात आली होती. ‘पश्चिम आशियातील घडामोडींकडे इराण कसे पाहतो?’ या विषयावर इराणचे राजदूत डॉ. इराज इलाही हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते. गुरूवारी (२४ ऑक्टोबर) रोजी आयोजित व्याख्यान विद्यापीठाकडून अचानक रद्द करण्यात आले. तसेच पॅलेस्टाईनचे राजदूत अदनान अबू अल-हाइजा यांचे ७ नोव्हेंबर रोजी ‘पॅलेस्टाईनमधील हिंसाचार’ यावर व्याख्यान होते आणि लेबेनॉनचे राजदूत डॉ. राबी नार्श यांचे १४ नोव्हेंबरला ‘लेबनॉनमधील परिस्थिती’ यावर होणारे व्याख्यान देखील रद्द करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईच्या भावावर १० लाखांचे बक्षीस!
भारत- चीनमध्ये झालेल्या करारानंतर दोन्ही बाजूंकडील सैन्य माघारी घेण्यास सुरुवात
झिशान सिद्दिकींनी काँग्रेसची साथ सोडली; वांद्रे पूर्वला वरूण सरदेसाईंविरुद्ध झुंज
जम्मू काश्मीरच्या गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
जेएनयू विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’च्या वरिष्ठ सदस्यांनी या कार्यक्रमाबाबत चिंता व्यक्त केली. अशा व्याख्यानांमुळे विद्यार्थ्यांमध्ये फूट पडून आंदोलने आणि निदर्शने होण्याची शक्यता असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जेएनयू विद्यापीठाच्या पश्चिम आशिया अभ्यास केंद्राच्या प्रमुख समीना हमीद म्हणाल्या, “इराणचे राजदूत डॉ. इराज इलाही यांचे व्याख्यान शेवटच्या मिनिटाला ठरले. त्यामुळे त्यांचे प्रोटोकॉल पाळण्यासाठी विद्यापीठाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे डॉ. इराज इलाही यांचे व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. विद्यापीठ आणि दूतावास यांच्यात विसंवाद झाला आहे. इराण, लेबेनॉन आणि पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत वेळोवेळी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि ते यापुढेही करत राहतील,” असं मत समीना हमीद यांनी व्यक्त केले आहे.