स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबद्दल गेल्या काही दिवसांत बरीच चर्चा झाली आहे. मात्र आता त्यांच्या प्रकृतीबद्दल समाधानकारक अशी बातमी समोर आली आहे.
प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना शुद्ध आली असून तब्बल १५ दिवस रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना शुद्ध आली आहे. दिल्लीच्य एम्स रुग्णालयात ते सध्या दाखल आहेत.
जिममध्ये व्यायाम केल्यानंतर राजू श्रीवास्तव यांना छातीत दुखू लागले होते. त्याचवेळी ते खाली कोसळले. तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण तेव्हापासून ते व्हेन्टीलेटरवर होते आणि त्यांची शुद्ध हरपली होती. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत चित्रपटसृष्टीकडून चिंता व्यक्त केली जात होती. मात्र १५ दिवसांनी ते पुन्हा शुद्धीत आले असून त्यांच्या प्रकृतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत, असे श्रीवास्तव यांचे सचिव गर्वित नारंग यांनी स्पष्ट केले आहे.
१० ऑगस्टला श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. तेव्हापासून ते कोमातच होते. पण आता हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. शिवाय, शुद्ध आल्यामुळे प्रकृतीचा धोका टळला आहे, अशीही शक्यता व्यक्त होत आहे.
राजू श्रीवास्तव हे स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रचंड लोकप्रिय आहेत. विशेषतः उत्तर भारतीय लहेज्यातील त्यांची विनोद सादर करण्याची धाटणी प्रचंड लोकप्रिय आहे. गजोधर हे त्यांनी साकारलेले पात्र लोकांच्या मनात अजूनही घर करून आहे. काही चित्रपटांतही त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या असून अमिताभ बच्चन यांची नक्कलही करूनही त्यांनी शाबासकी मिळविली आहे. बॉलीवूडच्या पुरस्कार वितरण सोहळ्यांमधील त्यांचे कार्यक्रम चांगलेच गाजले आहेत. अजूनही त्यांच्या त्या जुन्या व्हीडिओंवर लोकांच्या उड्या पडत असतात. नुकताच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.