स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे आज ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू होते. काल ५ फेब्रुवारी रोजी त्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, अखेर त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता शिवतीर्थावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच न्युमोनियाचेही निदान झाले होते. त्यानंतर मधल्या काळात त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली होती. ८ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता दीदी या आयसीयूमध्येच होत्या. गेल्या २८ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
एक सर्वोत्कृष्ट गायिका म्हणून लता दीदींची ओळख होती. लता मंगेशकरांच्या कारकीर्दीची सुरूवात त्यांच्या वयाच्या १३ व्या वर्षी १९४२ मध्ये झाली होती. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. तर २० पेक्षा अधिक अधिक भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे. प्रामुख्याने त्या मराठी भाषेतील गाणी गायल्या आहेत. लता मंगेशकर यांना गान कोकिळा म्हणूनही ओळखले जात. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. लता मंगेशकर यांच्या नावे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये विक्रम नोंद आहे. १९७४ ते १९९१ या कालावधीत सर्वात जास्त रेकॉर्डिंग्स त्यांनी केल्या होत्या.
हे ही वाचा:
बीसीसीआयची मोठी घोषणा; खेळाडूंना मिळणार एवढी रक्कम
भारताने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरत रचला इतिहास!
तीस हजारहून अधिक सापांना जीवनदान देणारा हा ‘स्नेक मास्टर’ आहे कोण? वाचा सविस्तर
आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैगिंग अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक
लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि संगीतकार- गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. तर लता दीदींचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य संगीताचे प्रसिद्ध गायक होते.