….आणि हेमा झाली स्वरकोकिळा लता मंगेशकर

….आणि हेमा झाली स्वरकोकिळा लता मंगेशकर

स्वरकोकिळा लता मंगेशकर भारताच्याच नाही तर विश्वातील सुप्रसिध्द गायिका असून त्यांना विसरणे शक्य नाही. गायिका लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्य प्रदेशमध्ये झाला होता. लताजींच्या आईचे नाव शेवंती (शुधामती) होते व त्या महाराष्ट्रातील थालनेर येथील होत्या आणि पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या त्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांचे मूळ आडनाव हर्डीकर असे आहे. परंतु त्यांच्या वडिलांनी ते बदलुन आपल्या मुळ गावावरून ते मंगेशकर असे केले. पुढे लतादिदींच्या जन्मानंतर काही काळातच हा संपूर्ण परिवार महाराष्ट्रात स्थायिक झाला.

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध आहे, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार- गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य- संगीताचे प्रसिद्ध गायक होते. मास्टर दीनानाथ ह्यांच्या या ज्येष्ठ कन्या होत्या.

मास्टर दीनानाथांच्या गायन कलेचा वारसा त्यांना लाभला होता. वडिलांच्या ‘बलवंत संगीत नाटक मंडळी’ च्या रंगमंचावर बाल वयात लता मंगेशकरांनी छोट्या भूमिकाही केल्या. ‘भेंडीबाजारवाले’ खाँसाहेब अमानअली आणि देवासच्या रजबअली घराण्याचे अमानतखाँ हे लता मंगेशकर यांचे शास्त्रीय संगीतातील प्रमुख गुरू होते.

‘हेमा’ असे दीदींचे नाव ठेवले होते. याच नावाने दीदींना हाक मारली जात असे, परंतु पुढे त्यांच्या वडिलांनी एका ‘भावबंधन’ नाटकामुळे प्रभावित होउन त्यांचे नाव बदलुन ‘लता’ असे ठेवले.

वयाच्या पाचव्या वर्षी दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. १९४२ मध्ये दीदी १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले. अवघ्या १३ व्या वर्षापासून दीदींनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला सुरुवात केली. १९४३ मध्ये त्यांनी मुंबईतील रेडिओ स्टेशनवर काम करायला सुरुवात केली. ‘मंगळागौर’ या मराठी चित्रपटात लता मंगेशकर यांना पहिल्यांदा समूह गायनाच्या रूपाने छोटीशी भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.

‘माता एक सपूत की दुनिया बदल दे तू’ हे त्यांनी पहिले हिंदी गाणे गायले होते. पुढे दीदी १९४५ साली मुंबईला गेल्या आणि येथुनच त्यांनी आपली संगीत प्रतिभा आणखीन उज्वल होण्याकरीता उस्ताद अमानत अली खान यांच्याकडुन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे धडे गिरवण्यास सुरूवात केली. यानंतर दीदींनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. यशाची पायरी त्या सर करतच राहिल्या. कुटुंबाचा भार आणि कुटुंबियांची जबाबदारी पार पाडता यावी म्हणून दीदी अविवाहित राहिल्या.

दीदींनी एक हजाराहून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. छत्तीसहून अधिक प्रादेशिक भारतीय भाषा आणि परदेशी भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांची प्रमुख गाणी मराठी, हिंदी, बंगाली भाषेत आहेत. त्यांना जगभरात ‘भारताची कोकिळा’ म्हणूनच ओळखले जाते. त्या दक्षिण आशियातील विशेषतः भारतातील सर्वोत्कृष्ट आणि प्रतिष्ठित पार्श्वगायिका होत्या. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये ‘जगातील सर्वांत जास्त गाणी ध्वनिमुद्रित करणारी गायिका’ म्हणून त्यांचा गौरवास्पद उल्लेख आहे. त्या ‘सुरेल चित्र’ या संस्थेच्या निर्मात्याही होत्या.

हे ही वाचा:

हृदयाची तार छेडणारा तारा निखळला

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

केरळची महिला अबुधाबीमध्ये झाली मालामाल! वाचा सविस्तर

दीदींना मिळालेले पुरस्कार

दीदींनी संगीत क्षेत्रात दिल्या गेलेल्या अभुतपुर्व योगदाना करीता त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दीदींना फिल्मफेअर या पुरस्काराने सहा वेळा सन्मानित केले गेले. तर दीदींना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र शासन पुरस्कार दोन वेळा देऊन दीदींना सन्मानित केले आहे. १९६९ मध्ये लता मंगेशकर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

१९८९ मध्ये त्यांना चित्रपट जगतातील सर्वोच्च सन्मान ‘दादा साहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आला होता. तसेच, ‘लाइफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’, ‘राजीव गांधी पुरस्कार’ आणि झी सिनेच्या ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित केले होते. २००१ मध्ये त्यांना स्टारडस्टचा ‘जीवनगौरव पुरस्कार’, नूरजहाँ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्याच वर्षी दीदींनी ‘भारतरत्न’ देऊन गौरवण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाने त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दलचा गौरव म्हणून त्यांच्या नावे महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार दिला जातो.

Exit mobile version