लता मंगेशकर या नावातच सात सूर आहेत. त्यांच्या सदाबहार गाण्यांवर गेली ७० दशके जग डोलते आहे. २८ सप्टेंबर ही त्यांची जयंती. त्यांच्या या पहिल्या जयंतीच्या निमित्ताने या महान गायिकेला वाहिलेली ही श्रद्धांजली.
गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची २८ सप्टेंबर ही पहिली जयंती. २८ सप्टेंबर १९२९ला त्यांचा जन्म इंदूर, मध्य प्रदेश येथे झाला. आपल्या अवीट गाण्यांनी जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या या सदाबहार गायिकेला वंदन करतानाच तिच्याविषयीच्या अनेक ज्ञात अज्ञात गोष्टींकडे लक्ष जाते. लता मंगेशकर यांचा संघर्ष, त्यांनी गायनक्षेत्रात घेतलेली झेप, हजारो गाण्यांचा चाहत्यांना पेश केलेला नजराणा, तब्बल ७० दशके संगीतक्षेत्रावरील अनभिषिक्त सत्ता, असंख्य भाषांमध्ये गीतांना दिलेला आवाज याचा शोध आपण घेऊ लागतो. तो एक खजिना आहे. त्यातून जेवढे घेऊ तेवढे कमीच.
लता मंगेशकर हे त्यांचे सप्तसुरांप्रमाणेच सप्तअक्षरांत बांधले गेलेले नाव जगाला ठाऊक आहेच पण त्यांचे मूळ नाव होते हेमा. पण लतादीदींचे वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या भावबंधन या नाटकातील एक पात्र लतिका यावरून त्यांचे नाव लता ठेवण्यात आले.
दीनानाथ मंगेशकर यांच्याप्रती लतादीदींना अपार श्रद्धा होती. इवलेसे रोप लावयले दारी, तयाचा वेळू गेला गगनावरी प्रमाणेच लतादीदींच्या गायनाची ही वेल दीनानाथ मंगेशकर यांनी हेरलेल्या त्यांच्यातील कलागुणांमुळे वरवर झेपावत गेली.
लतादीदी एकदा म्हणाल्या होत्या की, एकदा माझे वडील आपल्या एका शिष्याला राग पुरिया धनश्री म्हणायला लावत होते. तो राग आळवत असताना दीनानाथ मंगेशकर आपल्या कामातही व्यग्र होते. तेवढ्यात त्या शिष्याची छोटी चूक झाली. पण तिथेच खेळत असलेल्या छोट्या लताने लगेच ती चूक सुधारत राग म्हटल्यावर दीनानाथ यांना आपल्या मुलीमध्येच एक शिष्योत्तम दडल्याचे लक्षात आले. दीनानाथ मंगेशकर म्हणाले की, आपल्या घरातच एक उत्तम गायक आहे आणि आपल्याला ते माहीतच नव्हते.
वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी लतादीदींनी आपल्या व्यावसायिक गायनाला प्रारंभ केला. दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत नाटकात काम करताना आणि त्यांच्याकडून संगीताचे बारकावे समजून घेतानाच अमन अली खान साहीब आणि अमानत खान यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरविले. १९४२मध्ये किती हसाल या चित्रपटात त्यांनी आपले पहिलेवहिले गाणे म्हटले. पण ते गाणे कधी समोर आलेच नाही कारण त्या चित्रपटातून ते कापण्यात आले. नटली चैत्राची नवलाई हे त्यांचे पहिले मराठी गाणे ठरले जे प्रसिद्ध झाले. त्यावेळी त्या अवघ्या १३ वर्षांच्या होत्या.
गायनक्षेत्रामध्ये येण्यापूर्वी त्या अभिनय क्षेत्रातही प्रयत्न करत होत्या. १९४२ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर साऱ्या घराची जबाबदारी आली. तेव्हा १९४८पर्यंत त्यांनी विविध चित्रपटांत कामे केली. ८ चित्रपटातून त्यांना भूमिका मिळाल्या. त्यावेळी त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मीना, आशा, उषा, हृदयनाथ या भावंडांचीही जबाबदारी त्यांच्यावर होती. हे शिवधनुष्य त्यांनी पेलले.
हे ही वाचा:
कोकणात ‘कांदळवन पर्यटन गाव’ ही संकल्पना
ब्रिटनमधील हिंदू मंदिरांवरील हल्ले थांबवा, जिहाद्यांना अटक करा
अंकुर राऊत, शोभा शिंपी यांनी भरले अर्ज
‘बुरखा घातला नाही म्हणून केलेली हिंदू तरुणीची हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार’
किशोर कुमार यांच्याशी त्यांची घनिष्ट मैत्रीही होती आणि त्यांनी असंख्य गाणीही एकत्र गायली. आपकी कसममधील एक गाणे सुनो कहो, कहा सुना कुछ हुआ क्या, या गाण्याबद्दल त्यांनी एक मजेशीर आठवण सांगितली. हे गाणे लतादीदींकडे आल्यानंतर त्यांनी त्याची तयारी सुरू केली पण किशोरदांच्या हाती जेव्हा हे गाणे पडले तेव्हा ते खोखो हसत सुटले. तेव्हा लतादीदी त्यांना म्हणाल्या की, का हसताय या गाण्याला. काय झाले? तेव्हा किशोरदा म्हणाले की, जणू काही शेजारी शेजारी असलेल्या शौचालयात बसून एकमेकांना दोनजण विचारत असल्यासारखे हे गाणे वाटते. तेव्हा लतादीदींचीही हसून हसून मुरकुंडी वळली. ते गीत असे होते…
सुनो, कहो
कहा, सुना
कुछ हुआ क्या
अभी तो नही
कुछ भी नही
चली हवा
उडी घटा
कुछ हुआ क्या…
पटले ना तुम्हाला का हसल्या असतील लतादीदी ते.
लतादीदींना १९४९मध्ये प्रसिद्धीचे शिखर गाठता आले. त्यावेळी आयेगा आनेवाला या गाण्याने त्यांना विलक्षण लोकप्रियता मिळवून दिली. महल या चित्रपटातील हे गाणे होते. १९६२मध्ये भारताला चीनकडून युद्धात हार सहन करावी लागली होती. तेव्हा लतादीदींनी गायलेले ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे अजरामर झाले. आजही स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिनी हे गाणे वाजविले जाते तेव्हा डोळ्यात अश्रु दाटून येतात.
लतादीदींचे क्रिकेटवर अफाट प्रेम होते. सचिन तेंडुलकर ऐन भरात असताना त्यांचे सचिनशी मुलासारखेच नाते तयार झाले. सचिनही लतादीदींना मानत होता. त्यांना क्रिकेटचे इतके वेड होते की, लंडनमधील लॉर्डस क्रिकेट मैदानात त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली जात असे.
अनेक संगीतकारांसोबत त्यांनी अवीट गोडीची गाणी दिली पण मदन मोहन यांच्याशी असलेले त्यांचे नाते वेगळे होते. भावाबहिणीच्या नात्यासोबतच अत्यंत आव्हानात्मक आणि कानांना तृप्त करणाऱ्या अशा गाण्यांचा नजराणा या दोघांनी चाहत्यांना दिला. आपल्या पहिल्या चित्रपटात लतादीदींना गाण्याची संधी देऊ शकलो नाही याचे शल्य मदन मोहन यांना होते. त्यामुळे त्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी लतादीदींना आपल्या घरी नेले आणि त्यांच्या हाती राखी देत म्हटले की बांध माझ्या हातावर राखी. आजपासून मी तुझा मोठा भाऊ आणि तू माझी छोटी बहीण. आजपासून माझ्या प्रत्येक चित्रपटात तू गाणे म्हणशील. त्यानंतर लग जा गले, रस्म ए उल्फत को निभाए कैसे, वोह चुप रहे तो, माई री मै कासे कहूँ, वो भुली दास्ताँ, आज सोचा तो आसू भर आए, आपकी नजरो ने समझा, ये हसरतो के दाग अशी अनेक गाणी आजही रसिकांच्या मनात रुंजी घालतात.
लता मंगेशकर आणि महान गायक मोहम्मद रफी यांची जोडीही लाजवाब होती. असंख्य दर्जेदार गाणी या दोघांनी दिली. त्यांच्या जोडीने एक काळ गाजविला. लोकांच्या ओठांवर त्यांची आणि त्यांचीच गाणी असत. गायकांना रॉयल्टी मिळावी या मुद्द्यावरून या दोघांमध्ये मतभेद झाले. काही काळ ते एकमेकांसोबत गायले नाहीत हे खरे असले तरी या दोघांनी ये दिल तुम बिन, जो वादा किया वो निभाना पडेगा, तेरी बिंदिया रे, वो है जरा खफा खफा, चलो दिलदार चलो, वो जब याद आए अशा एकापेक्षा एक सरस गाण्यांनी रसिकांना तृप्त केले. दोघांनी जवळपास ५०० पेक्षा अधिक गाणी एकत्र गायली.
लतादीदींचे ६ फेब्रुवारी २०२२ला निधन झाले. त्यांनी निर्माण केलेला हा संगीताचा अफाट वारसा यापुढेही रसिकांना मंत्रमुग्ध करत राहील. लतादीदींना वंदन!!