भारत गेले काही वर्षे मोठ्या प्रमाणात अपारंपारिक उर्जा स्रोतांना प्राधान्य देत आहे. त्यामध्ये सौर उर्जेचा क्रमांक बराच वर आहे. त्याच संदर्भात भारताने मोठा निर्णय घेतला आहे.
लडाखच्या लेहमध्ये भारताचा पहिला सर्वात मोठा बॅटरी स्टोरेज प्रकल्प आणि सौर उर्जा निर्मिती प्रकल्प येऊ घातला आहे. बॅटरी स्टोरेज आणि सौर उर्जा निर्मिती या दोन्ही प्रकल्पांची निर्मिती एकत्रितपणे केली जाणार आहे. यापैकी सौर उर्जा प्रकल्पाची क्षमता तब्बल ५० मेगावॅट इतकी आहे.
हा प्रकल्प टाटा पॉवर सोलर या कंपनीला देण्यात आला आहे. या प्रकल्पाची निर्मिती लेहच्या फायलांग गावाजवळ होणार आहे. हा प्रकल्प मार्च २०२३ मध्ये कार्यान्वित होईल असा अंदाज आहे.
हे ही वाचा:
संसदेतील तमाशा, पवारांची घुसमट
ट्विटरनंतर इन्स्टाग्रामचीही राहुल गांधींवर कारवाई
एनसीबीच्या समीर वानखेडेंचे केंद्राने का केले कौतुक?
टाटा पॉवर सोलरने याबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार हा भारतातील पहिला एकत्रित उभा राहणारा प्रकल्प असून लडाख केंद्रशासित प्रदेशात समुद्रसपाटीपासून ३६०० मीटर उंचीवर उभा राहणारा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
कंपनीला दिलेल्या कामामध्ये या प्रकल्पाची आखणी, प्रारूप तयार करणे, अभियांत्रिकी, बांधकाम, संचलन आणि वीज पुरवठा या सर्वांचा समावेश आहे.
टाटा पॉवर सोलर ही देशातील सौर उर्जा क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. त्यांनी आत्तापर्यंत अनेक विविध सौर उर्जा प्रकल्प हाताळले आहे. यामध्ये १५० मेगावॅटचा अनंतपूर येथील अयन प्रकल्प, केरळच्या कासारगोड येथील ५० मेगावॅटचा प्रकल्प यांचा समावेश आहे. त्याबरोबरच या कंपनीने गुजरात येथील ढोलेरा सोलर पार्क येथील ४०० मेगावॅट उर्जा निर्मितीच्या लिलावात देखील बाजी मारली आहे. लेह येथील प्रकल्पानंतर या कंपनीच्या सध्या चालू असलेल्या प्रकल्पांची एकत्रित किंमत एकूण २४१४ कोटी रुपये झाली आहे.