गुरुवारी ४० वर्षीय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. कमी वयात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू होणाऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेता हृदय रोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते गेल्या दहा वर्षांत युवकांना हृदय रोग होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. जंक फूडचे अति सेवन, धावपळीचे आणि व्यस्त जीवन, बदलती जीवनशैली, कामाचा ताण आणि नशा आदी कारणे हृदय विकारांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मागील १० ते १५ वर्षांपासून ३० ते ४० किंवा त्याखालील वयाच्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या घटना अधिक वाढल्या आहेत. त्या वाढण्या मागचे प्रमुख कारण म्हणजे धूम्रपान असल्याचे मत केईएम रुग्णालयाचे कार्डियाक विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी व्यक्त केले आहे. हृदयविकाराच्या घटनांमागे व्यायाम न करणे किंवा अति प्रमाणात करणे ही कारणे ही आहेत, असेही डॉ. केरकर यांनी सांगितले. कोरोनामुळे हृदयावर परिणाम होतो आणि त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होऊन हृदयाला धोका होऊ शकतो.
हे ही वाचा:
देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?
२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत
ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही
शहरातील तरुणांमध्ये हृदयाच्या समस्या अधिक दिसून येतात. कामाचा अतिरिक्त ताण, जंक फूड सेवन आणि तंदुरुस्त आहाराचा अभाव यामुळे समस्या जास्त निर्माण होतात, असे डॉ. अनिल शर्मा यांनी सांगितले. बॉलीवूडमधल्या एखाद्या नायकाप्रमाणे शरीरयष्टी बनवण्याच्या हट्टाने अनेक तरुण जिममध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत असतात. त्यासाठी अनेकदा ते अतिरिक्त स्टेरोइड्स घेतात त्यामुळेही हृदयाचे आजार होऊ शकतात, असे नानावटी रुग्णालयाच्या डॉ. लेखा पाठक यांनी सांगितले.
नानावटीच्या डॉ. उषा किरण यांनी सांगितले की हृदयाला तणावमुक्त ठेवण्यासाठी नीट श्वासोच्छवास करणे आवश्यक असते. सोबतच समतोल आहारची आवश्यक आहे. अति व्यायाम धोकादायक असून सोपी योगासने सुद्धा हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात, असेही त्या म्हणाल्या.