कळवा येथे घरांवर कोसळली दरड

कळवा येथे घरांवर कोसळली दरड

कळवा पूर्व येथील इंदिरा नगरमध्ये माँ काला चाळ परिसरात रात्री उशिरा भूस्खलनाची घटना घडली. यामुळे सहा घरांचे नुकसान झाले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोलिस अधिकारी तसेच अग्निशमन दलही दाखल झाले आहे. या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी घडली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

कळवा येथे ही दुर्घटना रात्री उशिरा घडली होती. अधिक माहितीनुसार, खबरदारी म्हणून जवळच्या घरांतील रहिवाशांना आरडीएमसी टीम आणि अग्निशमन दलाच्या मदतीने घोलाई नगरमधील टीएमसी शाळेत हलवण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नव्या युतीच्या फुसकुल्या

…म्हणून राहुल गांधींचे ट्विटर खाते झाले लॉक!

धीर धरा… पण किती काळ?

जेष्ठ संघ प्रचारकांचा सन्मान…टपाल खात्याने प्रकाशित केले टपाल तिकीट

या घटनेनंतर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. मातीचा ढिगारा उपसण्यात येत आहे. डोंगराळ भागात ही वस्ती असल्याने या परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता तर नाही ना? याचीही तपासणी करण्यात येत आहे. याच परिसराच्या काही अंतरावर घोलाईनगर भागात दरड कोसळून ५ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर पालिकेने ठाण्यातील डोंगरपट्ट्यांमधील भागात नोटिसा देखील बजावल्या होत्या.

राज्य सरकारने डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येणार आहे का?, असा संतप्त सवालही या नागरिकांनी केला आहे.

या आधी महाड तालुक्यातील तळीये आणि चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली होती. पावसाळ्यात डोंगराची जमीन खचून दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत तसेच दरड प्रवण क्षेत्राची पाहणीही शासनाकडून केली जात आहे.

Exit mobile version