उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले की, पूर्वीच्या सरकारांच्या काळात लँड माफियांनी प्रयागराजमधील पौराणिक स्थळे जसे की अक्षयवट, माता सरस्वती कूप, पाताळपुरी, श्रृंगवेरपूर, द्वादश माधव आणि भगवान बेणी माधव यांच्यावर अवैध कब्जा केला होता. त्यामुळे या स्थळांच्या गरिमेला मोठा धक्का बसला. मात्र, महाकुंभच्या निमित्ताने हे स्थळ माफियांच्या तावडीतून मुक्त करून त्यांचे पुनरुत्थान करण्यात आले, ज्यामुळे आता भाविक वर्षभर दर्शन घेऊ शकतात.
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, महाकुंभच्या आयोजनाने भारताच्या सामर्थ्याची आणि सनातन धर्माच्या वास्तविक स्वरूपाची ओळख जगाला करून दिली. तसेच, उत्तर प्रदेशची नकारात्मक प्रतिमा बदलण्यातही यश मिळाले. त्यांनी बुधवारी लखनौमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. योगी आदित्यनाथ म्हणाले की, महर्षी भारद्वाजांची नगरी प्रयागराज, जी जगातील पहिल्या गुरुकुलाची भूमी आहे, ती पूर्वीच्या सरकारांच्या काळात माफियांच्या अधिपत्याखाली होती. गुलामीच्या काळात अक्षयवटला कैद करून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे तब्बल ५०० वर्षे भाविक त्याच्या दर्शनास मुकले. माता सरस्वती कूप आणि पाताळपुरीसारखी पवित्र स्थळे दुर्लक्षित राहिली, तर श्रृंगवेरपूर – जिथे भगवान राम आणि निषादराज यांची मैत्री झाली, त्या ठिकाणी लँड जिहादद्वारे कब्जा करण्यात आला.
हेही वाचा..
संभलमधील जामा मशिदीसह १० मशिदी होळीनिमित्त ताडपत्रीने झाकणार
पाकिस्तानचा रडीचा डाव, बलुचिस्तान रेल्वे अपहरणाला म्हणे भारत जबाबदार!
होळीच्या पार्श्वभूमीवर संभलमध्ये शासनाचे गस्ती पथक तैनात
उत्तराखंडमध्ये १५ दिवसांत ५२ बेकायदेशीर मदरसे सील
द्वादश माधव आणि नागवासुकीसारखी स्थळेही अतिक्रमणाच्या विळख्यात अडकली होती. महाकुंभच्या वेळी नवीन कॉरिडॉर उभारून ही स्थळे मुक्त करण्यात आली, ही आपल्या पौराणिक परंपरेबद्दलची कृतज्ञता आहे. मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले की, महाकुंभच्या आयोजनामुळे उत्तर प्रदेशबद्दलची नकारात्मक प्रतिमा बदलली. यामधून सनातन धर्माचे खरे आणि व्यापक स्वरूप जगासमोर मांडण्यात आले. त्रिवेणी संगमात प्रत्येक जाती, पंथ आणि प्रदेशातील भाविकांनी एकत्र डुबकी घेतली, हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चे प्रतीक आहे.
विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या लोकांची विचारसरणी नकारात्मक आहे, त्यांच्याकडून सकारात्मकतेची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. त्यांनी १९५४ पासून २०१३ पर्यंतच्या कुंभमेळ्यांच्या काळात झालेल्या अव्यवस्थांचे उदाहरण दिले. १९५४ मध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला, २००७ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली, तर २०१३ मध्ये मॉरिशसच्या पंतप्रधानांनी संगमाच्या अस्वच्छतेवर दु:ख व्यक्त केले होते. पूर्वीच्या सरकारांनी कुंभाला अस्वच्छतेचे केंद्र बनवले होते, मात्र आता त्याच सरकारांचे लोक स्वच्छ महाकुंभवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
२०२५ च्या महाकुंभबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, हा कुंभ स्वच्छता, सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना असेल. २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली कुंभाची नकारात्मक प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न झाला, जो २०२५ मध्ये आणखी प्रभावीपणे लागू केला जाईल. डिजिटल महाकुंभच्या संकल्पनेसह ५४,००० हरवलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा जोडण्यात आले. १.५ लाख शौचालये बांधण्यात आली आणि त्यांना QR कोडद्वारे जोडण्यात आले. ११ भाषांमध्ये विशेष अॅप तयार करून भाविकांना सुविधा देण्यात आल्या.
मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले की, २०२५ च्या महाकुंभसाठी ४० कोटी भाविकांच्या येण्याचा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ६६.३० कोटींपेक्षा जास्त भाविकांनी स्नान केले. पौष पौर्णिमेला १.५ कोटी, मकर संक्रांतीला ३.५ कोटी आणि मौनी अमावास्येला तब्बल १५ कोटी लोकांनी स्नान केले. मुख्यमंत्री योगींनी मौनी अमावस्येच्या रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेचा उल्लेख करत सांगितले की, १० कोटींपेक्षा अधिक गर्दीमध्ये काही लोक जखमी झाले आणि काही जणांचा मृत्यू झाला. प्रशासनाने तत्काळ संत आणि आखाड्यांच्या प्रमुखांशी चर्चा करून अमृत स्नान दुपारपर्यंत स्थगित केले. संतांनी मोठ्या जनहिताच्या दृष्टीने सहकार्य केले आणि त्यानंतर स्नान सुरळीत पार पडले.
विरोधकांवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, जे लोक औरंगजेबला आदर्श मानतात, ते मानसिक विकृतीचे शिकार आहेत. त्यांनी शाहजहानच्या पुस्तकाचा दाखला देत सांगितले की, औरंगजेबाने आपल्या वडिलांना कैद करून एका थेंब पाण्यासाठीही तडफडवले आणि भावाची हत्या केली. जे लोक औरंगजेबला आदर्श मानतात, त्यांनी आपल्या मुलांची नावे औरंगजेब ठेवावी आणि त्याच्यासारखे अत्याचार सहन करण्यास तयार राहावे.
संभळचा उल्लेख करताना मुख्यमंत्री म्हणाले की,५००० वर्षे जुन्या पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे, जिथे श्रीहरीचा दहावा अवतार होणार आहे. १५२६ मध्ये मीर बाकीने तेथील मंदिर तोडले, मात्र आता १८ तीर्थस्थळांचे उत्खनन झाले आहे. इतिहास लपवणाऱ्यांनी पुराणे वाचली पाहिजेत. आस्था आणि अर्थव्यवस्था यांना एकत्र जोडून हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. नवीन भारत आस्था आणि अर्थव्यवस्थेत दोन्ही बाबतीत अग्रेसर असेल.