कुसळाच्या शोधात लँसेट

कुसळाच्या शोधात लँसेट

लँसेट या जगप्रसिद्ध नियतकालिकामध्ये भारतातील लसीकरणाबाबत फार ‘मौलिक’ माहिती प्रसिद्ध झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात हे नियतकालिक सर्वात जुन्या नियतकालिकांपैकी असल्याने या नियतकालिकातील लेख भारतीय अनेक वर्तमानपत्र उचलून धरतात. त्यापैकी काहींनी तात्काळ नेहमीप्रमाणे परदेशी माध्यमांत मोदी सरकारवर टीका झाली म्हणून आनंदाने हा लेख उचलून घेतला खरा, पण त्यातल्या आकडेवारीकडे थोडं काळजीपूर्वक पहायला हवं.

लँसेटच्या संपादकीयमध्ये भारताच्या लसीकरण कार्यक्रमावर टीका करण्यात आली. त्यातल्या काही गोष्टी मान्य केल्या तरी भारतीय लसीकरणाच्या कार्यक्रमाचा फायदा झालेल्या लोकांची संख्या केवळ टक्केवारीत मोजणं, ही शुद्ध धुळफेक आहे. १३६ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशातील कित्येकांना लसी दिल्यानंतर इतक्या मोठ्या लोकसंख्येची लसीकरण झालेली टक्केवारी वधारलेली दिसेल. याबाबतीतील उदाहरण पाहू.

ब्रिटनच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये एकूण ५ कोटी २४ लाख ३ हजार ४१७ लोकांचे लसीकरण झाले आहे (८ मे २०२१ च्या आकडेवारीनुसार). याच्याउलट ९ मे २०२१ रोजी भारतात एकूण लसीकरण झालेल्या लोकांची सख्या १६ कोटी ९४ लाख ३९ हजार ६६३ लोकांचे लसीकरण झाले आहे.

जर हीच आकडेवारी किमान पहिला डोस मिळालेल्या लोकांची पाहिली, तर भारताची कामगिरी खरोखर दमदार असल्याचे समोर येते. देशांच्या बाबतीत किमान एक डोस मिळालेल्या लोकांची संख्या भारतात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, इतकेच नव्हे तर भारत संपूर्ण युरोपिय युनियनपेक्षाही वर आहे. Our World in Data या संकेतस्थळावर हा डेटा सहज उपलब्ध आहे.

खालच्या ग्राफवरून ही गोष्ट स्पष्ट होईल. युरोपियन युनियन पेक्षाही जास्त डोसेस दिलेला भारत देश आहे. भारताचा एकूण विस्तार आणि आपल्या सर्व सुविधांची एकंदरित अवस्था लक्षात घेता, भारताची एकूण कामगिरी नक्कीच दमदार आहे.

या संपादकीयच्या शेवटी भारताला शहाजोगपणे काही लसी आयात करूनही लसीकरण कार्यक्रम बळकट करण्याचा सल्ला देतात. आश्चर्य म्हणजे भारताने आपल्यासारख्याच इतर अविकसित राष्ट्रांना लस वेगाने मिळावी, जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचावी आणि जगाच्या एकूण लसीकरण मोहिमेलाही बळकटी यावी या हेतून जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत केलेल्या TRIPS करारानुसार, लसींवर लागलेली बौद्धिक संपदेच्या साखळ्या तोडून ती मुक्त करावी असा धोशा लावला आहे. परंतु, लसीकरण बळकट करण्याचा सल्ला देणाऱ्या लँसेटच्या संपादकांना याबाबत एक अक्षर लिहावंसं वाटू नये हे खटकणारे आहे. ज्यामुळे लसीकरण वेगाने होऊन जगातील साथ आटोक्यात यायला मदत होणार आहे, परंतु त्यासाठी विकसित राष्ट्रांना आपला स्वार्थ बाजूला सारावा लागणार आहे, आणि औषध कंपन्यांना या काळात शक्य असलेल्या भरघोस नफ्यावर पाणी सोडावं लागणार आहे, त्याबाबतच नेमकं लँसेट मौन बाळगून आहे.

– प्रणव पटवर्धन

Exit mobile version