श्रीनगरमधील लाल चौक… रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत. देश-विदेशी पर्यटकांची लगबग सुरू आहे. रोषणाईच्या झगमगाटात काश्मिरी चहाचा आस्वाद जोडपे घेत आहेत. याच दरम्यान एक पंजाबी कुटुंब एकाला फोटो काढण्याचा आग्रह करते. फोटो काढल्यानंतर पत्रकाराने विचारले, लाल चौकावर फडकणारा तिरंगा आणि या शांततेचे श्रेय कोणाला देणार? मात्र त्याने मी सरकारी कर्मचारी आहे, त्यामुळे मी कोणाचे नाव तर नाही घेऊ शकत, मात्र हे पिढ्यानपिढ्याचे कष्ट आणि वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेचे फळ आहे, अशी प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाचे राजकीय-सामाजिक केंद्र
लाल चौक हे श्रीनगर शहरातील सर्वांत महत्त्वाचे राजकीय-सामाजिक केंद्र राहिले आहे. याच लाल चौकात मोठमोठ्या नेत्यांची भाषणे झाली आहेत. अशांततेच्या काळात दहशतवाद्यांनी या लाल चौकालाही लक्ष्य केले होते. लाल चौक सर्कलवरच एका दुकानात बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाला विचारल्यावर त्यांचे उभे आयुष्यच येथे गेल्याचे ते सांगतात. येथे ग्रेनेड फुटायचे आणि लाल चौकात रक्ताचा सडा पडायचा.
यंदा काश्मीरच्या तीन जागांपैकी एक असलेल्या श्रीनगरमध्ये १३ मे रोजी मतदान आहे. लाल चौक आणि आसपास राजकारणाशी संबंधित हालचाली वाढू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी आपल्या यात्रेदरम्यान लाल चौकात आले होते आणि त्यांनी तिरंगा फडकवला होता. या निवडणुकीतही अनेक उमेदवार येथे प्रचारसभा घेतील.
हे ही वाचा:
पीओकेत महागाईचा हाहाकार, नागरिक सुरक्षा दलासोबत भिडले, पोलिसाचा मृत्यू!
उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे ‘काळू बाळूचा तमाशाच’
‘उद्धव ठाकरेंना १९९९ पासूनच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती’
दहशतवादी धमक्यांनंतरही तिरंगा फडकला
लाल चौकावर पहिल्यांदा शेख अब्दुल्ला यांच्यासह तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी तिरंगा फडकवला होता. त्यानंतर दहशतवाद्यांचा जोर असताना येथे अनेक स्फोट झाले. याच परिसरात एका पत्रकारावर गोळ्या झाडून ठार करण्यात आले. त्यानंतर दहशतवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता भाजपचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी १९९२मध्ये एकता यात्रेदरम्यान २६ जानेवारी रोजी तिरंगा फडकवला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी या यात्रेत त्यांचे प्रमुख सारथी होते. त्यानंतर लाल चौकावर सरकारी कार्यक्रमादरम्यान तिरंगा फडकवला जात होता. काही फुटीरतावाद्यांनीही येथे शेजारी देशाचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला होता.
सेल्फी पॉइंट, धबधबा
कलम ३७० हटवल्यानंतर इथले वातावरणच पार बदलून गेले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत वॉच टॉवरला नवे स्वरूप देण्यात आले आहे. येथे नवे घड्याळ बसवण्यात आले आहे. तिरंग्यातील रोषणाईत येथे तिरंगा फडकत असतो. चौकाचे रुंदीकरण करण्यासह रंगबिरंगी टाइल्स आणि रोषणाई प्रत्येकाला आकर्षित करते आहे. येथील सेल्फी पॉइंट आणि धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरते आहे. त्यामुळे येथे दिवसभर लोकांची ये-जा असते. टॅक्सीचालक व गाइड नसीम सांगतात, येथे पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.