नववर्षाचा पहिला दिवस आणि शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी म्हणून लाखो आंबेडकरी अनुयायांनी गर्दी केली आहे. सोमवार, १ जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने अनुयायांनी उपस्थित राहून विजय स्तंभाला अभिवादन केले. यानिमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली असून विजयस्तंभालाही फुलांची सजावट करण्यात आली आहे.
भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी म्हणून १ जानेवारी रोजी राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येत असतात. यंदाच्या वर्षीही राज्यभरातील विविध ठिकाणांहून अनुयायी भीमा कोरेगाव येथे आले आहेत. विजय स्तंभ परिसरात रविवार, ३१ डिसेंबर मध्यरात्रीपासून आतषबाजी तसेच सामुदायिक बुद्ध वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली.
अभिवादन करण्यासाठी कोरेगाव भीमा आणि पेरणे परिसरात येणाऱ्या लाखो अनुयायांना कोणत्याही सुविधा कमी पडणार नाहीत, याबाबतची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यावर्षी मोठ्या संख्येने येणाऱ्या अनुयायांबरोबरच बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी जिल्हा प्रशासनाने वाढीव संख्येने जय्यत तयारी केली होती.
रविवारी रात्रीनंतर नगर रस्त्यावर वाहनबंदी करण्यात आली होती. अनुयायांसाठी २९ ठिकाणी आरोग्य बूथ उभारण्यात आले असून २० फिरते बाईक आरोग्य पथके, ५० रुग्णवाहिका, ९० तज्ज्ञ डॉक्टर्स आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच जवळच्या खासगी रुग्णालयात पुरेशा औषध साठ्यासह शंभर खाटाही आरक्षित करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
निमंत्रण फक्त रामभक्तांना, मुख्य मंदिर पुजाऱ्यांकडून उद्धव आणि राऊतांची खरडपट्टी!
नव्या वर्षात भारतीय क्रिकेट संघ राहणार ‘बिझी’
भारतासोबतचे संबंध बिघडत असताना, मालदीवचे राष्ट्रपती चीनला भेट देण्याची शक्यता!
बिहारमध्ये एका रात्रीत तलाव चोरीला
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस आयुक्त रितेश कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ‘बार्टी’चे विभागप्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी तयारीचा आढावा घेत सुविधांसाठी संबंधित यंत्रणांना सूचनाही दिल्या आहेत.