राज्यातील महिला पोलिसांचे कामाचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिला पोलिसांचे कामाचे आठ तास करण्याच्या निर्णयामुळे कुटुंब आणि पोलीस दलातील नोकरी अशा दोन्ही जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महिला पोलिसांना केवळ आठच तास काम करावे लागेल. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले.
अनेक महिला पोलिसांना आठ तासांहून अधिक वेळ कर्तव्य बजावे लागत असल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या कौटुंबिक जीवनावर होत असल्याच्या तक्रारी महासंचालकांकडे येत होत्या. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांची कामाची वेळ कमी करण्याचा विचार करण्यात येत होता. त्यानुसार पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन टप्प्याटप्प्याने महिला पोलिसांसाठी ‘आठ तास कर्तव्य’ अशी संकल्पना कशी राबवता येईल याबाबत आराखडा तयार करण्यात आला होता.
हे ही वाचा:
भारतातील ‘हे’ रेल्वे स्थानक चालते १००% सौर उर्जेवर!
उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार नाहीच!
परमबीर यांना निलंबित करा! पोलिस महासंचालकांनी ठेवला प्रस्ताव
आरोग्य विभागाच्या महाभरतीचा महागोंधळ!
पहिल्या टप्प्यात नागपूर, पुणे, अमरावती आणि नवी मुंबईत ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. तेथील प्रतिसाद पाहून संपूर्ण राज्यात ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. महानगरांमध्ये महिला पोलिसांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. महिन्याभरात संपूर्ण राज्यात महिला पोलिसांसाठी ‘आठ तास कर्तव्य’ ही संकल्पना अमलात आणली जाणार आहे.
महिला पोलिसांचे कामाचे तास १२ वरून आठ करण्यात आल्याने महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुरुष पोलिसांच्या कामाच्या तासांबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यापूर्वी दत्ता पडसलगीकर मुंबईचे पोलीस आयुक्त असताना त्यांनी अधिकारी- कर्मचाऱ्यांचे कामाचे तास आठ केले होते.