भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. भारताने याआधीच कसोटी मालिका आपल्या खिशात टाकली आहे. पाचव्या कसोटीत चायनामॅन फिरकीपटू कुलदीप यादवने टीम इंडियाकडून शानदार गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी फलंदाजांचे कंबरडे मोडले. कुलदीपने इंग्लंडच्या अर्धा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवत इंग्लंडला सळो की पळो केले. कुलदीपने कसोटी कारकिर्दीतील ५० बळी पूर्ण केले आहेत. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान कुलदीपने १०० वर्षात जे कोणाला जमले नाही ते करून दाखवले आहे.
गेल्या १०० वर्षांत सर्वात कमी चेंडू फेकून ५० विकेट्स घेणारा कुलदीप पहिल्या क्रमांकावर आला आहे. तो भारतीय गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. कुलदीपने १८७१ चेंडू टाकून ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याची आत्तापर्यंतची कारकीर्द अप्रतिम राहिली आहे. कुलदीपने २१ डावांत ५१ विकेट्स घेतल्या आहेत. एका कसोटी डावात ४० धावांत ५ बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. कुलदीपने ४ वेळा कसोटीत पाच किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.
हेही वाचा :
रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?
उत्तर प्रदेशात सपाला आणखी एक धक्का बसणार!
रशियाच्या मिसाईलपासून झेलेन्स्की थोडक्यात बचावले
भारताकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पाहिली तर कुलदीप ४३ व्या क्रमांकावर आहे. अनिल कुंबळे अव्वलस्थानी आहे. कुंबळेने १३२ कसोटी सामन्यात ६१९ बळी घेतले आहेत. रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. अश्विनने १०० सामन्यांत ५०७ बळी घेतले आहेत. कपिल देव तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याने १३१ सामन्यात ४३४ विकेट्स घेतल्या आहेत.
दरम्यान, आपल्या १०० व्या कसोटीत आर. अश्विननेही दमदार कामगिरी करून दाखविली. त्याने ५१ धावांत ४ बळी घेत इंग्लंडची तळाची फलंदाजी संपुष्टात आणली.