आमचे संपूर्ण कुटुंब हे हिंदू आहे, असे स्पष्ट आणि परखड मत अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी व्यक्त केले आहे. आपल्या कुटुंबातील काही छायाचित्रांच्या माध्यमातून घरातील सगळे हिंदूच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नवे ट्विट करत समीर वानखेडे लग्नाच्या वेळेला मुस्लिमांची गोल टोपी घालून निकाहनाम्यावर स्वाक्षरी करत असल्याचा एक फोटो शेअर केला आहे. हे काय केले समीर वानखेडे यांनी? असा प्रश्न त्यांनी ट्विटमध्ये उपस्थित केला आहे. त्याला उत्तर देताना क्रांती रेडकर यांनी ‘आम्ही’ हिंदूच असल्याचे सांगणारी छायाचित्रे प्रसृत केली आहेत.
राज्यातील मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरू आहे.
क्रांती रेडकर यांनी काही छायाचित्रे दाखवून ‘आम्ही’ हिंदूच असल्याचे ठासून सांगितले आहे. त्यात त्यांनी आपल्या सासूबाई या हिंदू धर्मात केली जाणारी पूजा, त्यातले विधी करत असत, त्यात सहभागी होत असत, हिंदू पद्धतीने सगळ्या सणसमारंभात सहभागी होत असत असे म्हटले आहे. हळदीकुंकू कार्यक्रमात सासूबाई सहभागी होत असल्याचे छायाचित्रातून क्रांती रेडकर दाखवतात. पांढऱ्या व केशरी रंगातील वेशभूषा केलेल्या सासूबाई हिंदू समारंभात समरसून सहभागी होत असत असे क्रांती रेडकर यांनी म्हटले आहे.
क्रांती रेडकर म्हणतात की, आमचे संपूर्ण कुटुंब हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे. आम्ही सर्व धर्मांचा सारखाच आदर करतो. एवढेच नव्हे तर देशाची सेवा करणे हादेखील वानखेडे कुटुंबाचा धर्मच आहे.
क्रांती रेडकर यांनी काही छायाचित्रांच्या माध्यमातून समीर वानखेडे हे हिंदू पूजापद्धतीवर विश्वास ठेवतात, स्वतः पूजा, प्रार्थना करत असल्याचेही म्हटले आहे. सत्यनारायणाच्या पूजेला नमस्कार करताना समीर वानखेडे, स्वतः क्रांती रेडकर समीर वानखेडे यांची आरती ओवाळतानाची, क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांच्या हिंदू पद्धतीने झालेल्या लग्नाची छायाचित्रे या द्वारे क्रांती रेडकर आपले कुटुंबीय संपूर्ण हिंदू असल्याचे दर्शवितात.
हे ही वाचा:
खड्ड्यांमुळे रायफलमधून गोळी सुटली आणि जवानाचा गेला प्राण
पवार-परब बैठकीत साडेचार तास फक्त चर्चा
छत्तीसगडमध्ये १२०० जणांनी केला हिंदू धर्मात प्रवेश
‘तळीरामांची जशी काळजी घेता तशी मराठा समाजातील तरुणांचीही घ्या’
नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचे आरोप पत्रकार परिषदांच्या माध्यमातून सुरू केले आहेत. त्याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सव्वा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा न्यायालयात दाखल केला आहे. त्यासंदर्भात सध्या न्यायालयात खटला सुरू आहे.