छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला काल कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणातून अटक केली. आरोपीला कोल्हापुरात आणल्यानंतर आज (२५ मार्च) कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याच दरम्यान, प्रशांत कोरटकर हा तेलंगणामध्ये काँग्रेसच्याच एका नेत्याकडे लपून बसला असल्याचा आरोप भाजपा नेते परिणय फुके यांनी केला आहे. विधानसभा परिसरात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
परिणय फुके म्हणाले, प्रशांत कोरटकरबाबत तक्रार दाखल होताच त्याच दिवशी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर प्रशांत कोरटकरने कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाने त्याला संरक्षण दिले. त्यामुळे पोलीस काही करू शकले नाही. कोर्टाचे संरक्षण हटवण्याकरिता स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले. संरक्षण काढून घेतल्यानंतर चार-पाच दिवसात प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली.
ते पुढे म्हणाले, तेलंगणामध्ये काँग्रेसच्या एका नेत्याकडे कोरटकर लपून होता. कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसकरत होती हे स्पष्ट झाले आहे. प्रशांत कोरटकरवर कडक कारवाई होईल, असे परिणय फुके म्हणाले.
हे ही वाचा :
माझे करिअर चढ-उतारांनी भरलेले – शरवरी वाघ
दोन मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी लोक काहीही करतात
कमजोरी, सर्दी-खोकल्यावर ‘च्यवनप्राश’चा प्रभावी उपाय
बांगलादेश : एनसीपी आणि बीएनपीमध्ये संघर्ष
दरम्यान, प्रशांत कोरटकरने छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली होती. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अटकेच्या भीतीने प्रशांत कोरटकर फरार होता. अखेर काल कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने तेलंगणातून कोरटकरला अटक केली.