चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ

चेन्नईला नमवून कोलकाताचा विजयी शुभारंभ

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला शनिवार, २६ मार्च पासून सुरुवात झाली. काल गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात यंदाच्या हंगामाचा पहिला सामना रंगला. पहिल्या सामन्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर कोलकाताने चेन्नईला धूळ चारत विजयी सुरुवात केली. चेन्नईने दिलेले १३१ धावांचे लक्ष्य कोलकाताने सहा गडी राखत पूर्ण केले.

प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत चेन्नईला १३१ धावांवर रोखले. फलंदाजीसाठी आलेले चेन्नईचे खेळाडू मैदानावर जास्त काळ तग धरू शकले नाहीत. सलामीसाठी आलेले ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्वे स्वस्तात माघारी परतले. ऋतुराज याला भोपळाही फोडता आलेला नाही. तर कॉन्वे तीन धाव करून तंबूत परतला. त्यानंतर रॉबिन उथप्पाने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, २८ धावा करून उथप्पा झाला. त्यानंतर ६१ धावा होईपर्यंत चेन्नईचे पाच गडी बाद झाले. अंबाती रायडू १५ तर शिवम दुबे अवघ्या ३ धावा करुन तंबूत परतला. त्यामुळे शंभर धावा तरी चेन्नई करते की नाही अशी स्थिती असताना चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कर्णधार रविंद्र जाडेजा या जोडीने संघाला सावरत फलकावर १३१ धावा उभ्या केल्या. धोनीने ३८ चेंडूत नाबाद ५० धावा करत अर्धशतक केले तर जडेजाने २६ धावा केल्या. कोलकाताकडून उमेश यादव याने २० धावा देत २ गडी बाद केले तर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी चेन्नईचा प्रत्येकी एक एक गडी माघारी धाडला.

नंतर, फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताला सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिली. अजिंक्य रहाणेने ३४ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ धावा केल्या. व्यंकटेश अय्यरने १६ चेंडूंमध्ये १६ धावा केल्या. सॅम बिलिंग्सने २२ चेंडूंमध्ये २५ धावा तर नितीश राणाने १७ चेंडूंमध्ये २१ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर याने नाबाद २० धावा केल्या. एस. जॅक्सन याने नाबाद तीन धावा करत कोलकाताच्या विजयाला हातभार लावला. चेन्नईकडून ब्रावो याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. मात्र, गोलंदाज आणि फलंदाजांच्या मदतीने कोलकाताने विजय मिळवला.

हे ही वाचा:

इंस्टाग्रामवरील प्रेम प्रकरणातून घडला ‘लव्ह जिहाद’, मुलीची हत्या

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!

रविवार, २७ मार्च रोजी दुपारी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे, तर संध्याकाळी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे.

Exit mobile version