कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पुन्हा एकदा पटकाविले. सनरायझर्स हैदराबाद संघावर मात करत नाइट रायडर्सने तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपदावर नाव कोरले आहे. रविवारी चेन्नई येथे झालेल्या या अंतिम सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना १८.३ षटकांत अवघ्या ११३ धावाच केल्या. त्याला उत्तर देताना कोलकाताने २ विकेट्स गमावून ११४ धावा केल्या.
एकतर्फी झालेल्या या सामन्यात कोलकाता संघाने अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन केले. प्रथमच आयपीएलच्या अंतिम सामन्यात एवढी कमी धावसंख्या नोंदविली गेली.श्रेयस अय्यर हा आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देणारा दुसरा कर्णधार ठरला. याआधी, गौतम गंभीरने २०१२, २०१४मध्ये कोलकाता संघाला विजेतेपद जिंकून दिले होते. यावेळी गंभीर हा कोलकाता संघाचा मार्गदर्शक म्हणून संघाचा हा विजय पाहात होता. आयपीएलमध्ये आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी, गौतम गंभीर, रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांनी आपल्या संघांना आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे. अय्यर हा त्यांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे.
आयपीएलच्या इतिहासात यशस्वी संघ म्हणून कोलकाताने आपले स्थान निर्माण केले आहे. याआधी, चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने पाचवेळा विजेतेपद पटकाविले आहे. हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला मात्र कर्णधारपद मिळाल्यानंतर आपल्या पहिल्या अंतिम फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
हे ही वाचा:
पश्चिम बंगाल-ओडिशाच्या किनाऱ्यावर ‘रेमल चक्रीवादळ’ धडकण्याची शक्यता!
शिक्षिकेचा आवाज काढून सात विद्यार्थिनींवर बलात्कार
योगी आदित्यनाथ एकेकाची मस्ती उतरवण्यात वाकबगार आहेत!
भावेश भिंडेला २९ मे पर्यंत पोलीस कोठडी!
कोलकाताने या सामन्यात पूर्ण वर्चस्व गाजविले. या हंगामात हैदराबाद संघावर त्यांनी हा तिसरा विजय मिळविला. कोलकाताच्या मिचेल मार्शने हैदराबाद संघाची आघाडीची फळी कापून काढली. तर कोलकाताच्या अंतिम फेरीत प्रथमच खेळत असलेल्या आंद्रे रसेलने ३ विकेट्स घेतल्या. कोलकाताकडून वेंकटेश अय्यरने २४ चेंडूंत अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्याने हैदराबादच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
या हंगामात हैदराबादने २८७ धावांची खेळी केली होती पण अंतिम फेरीत ते ढेपाळले. त्यांनी आयपीएलच्या अंतिम फेरीतील सर्वात नीचांकी धावसंख्या केली.