ऑनलाईन मासे विकणाऱ्या एका कंपनीने मासे विक्री करणाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोळी समाजात संतापाची लाट पसरली आहे. ‘बाजारवाली मच्छी के साथ बदबू फ्री’ अशी जाहिरात करत बाजारातील माशांना वास येतो; मात्र आपल्याकडील मासळीला दुर्गंध येत नसल्याचा दावा या कंपनीने केला आहे. याला मच्छिमार संघटनेने हरकत घेत ही जाहिरात दाखवणे बंद करा, असे स्पष्ट करत कंपनीला नोटीस पाठवली आहे.
मुंबईत गेल्या दोन महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज मंडई आणि दादर येथील मीनाताई ठाकरे मंडई येथील मासे विक्रेत्यांना ऐरोली येथे जाण्यास सांगितले. त्यामुळे किरकोळ आणि घाऊक मासे विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आलेला असताना आता ही अशी जाहिरात केल्यामुळे मासे विक्रेत्यांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत.
हे ही वाचा:
‘मनी हाइस्ट’ला मुंबई पोलिसांची म्युझिकल सलामी
भारतीय संघाच्या चिंता वाढल्या! रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव
मुंबईतील ‘बॅंक चोर’ नायजेरियन टोळीला ग्वालियरमधून अटक
जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल
विक्रेत्यांना आधी मुंबईतून हलवण्यात आले आणि नंतर ही अशी जाहिरात म्हणजे मासे विक्रेत्यांविरुद्ध केलेले षडयंत्र आहे, असे अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्ष नयना पाटील यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी वकिलांच्या मदतीने कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून जाहिरात हटवण्याची मागणी केली आहे. मासेमारी आणि त्याची विक्री हा कोळी समाजाचा पारंपारिक व्यवसाय असून इतके वर्षे कधी वास आला नाही. ऑनलाईन मासे विकणाऱ्या कंपन्या सुरू झाल्यापासून त्यांच्याकडून ठरवून बाजारातील मासळीला बदनाम केले जाते. कोळी महिलांना देशोधडीला लावण्याचे हे कारस्थान आहे. सरकारने याची दखल घेऊन ऑनलाईन मासे विक्रीला बंदी घालावी, अशी मागणी नयना पाटील यांनी केली आहे.
जाहिरातीत एक ग्राहक बाजारातून मासळी घेऊन रस्त्यावरून चालताना आणि बसमधून प्रवास करताना आजूबाजूचे लोक नाकावर हात ठेवतात. बसमध्ये ‘तू आगे, मे तेरे पिछे पिछे’ असे गाणे लागते. घरी आल्यावरही त्या ग्राहकाची बायको नाकाला हात लावून दरवाजा लावून घेते. त्यानंतर ‘बाजारवाली मच्छी के साथ बदबू फ्री’ असा संवाद सुरू होतो आणि मग पुढे संबंधित ऑनलाईन मासे विकणारी कंपनी त्यांच्याकडून मासे खरेदी करण्याचे आवाहन करते.