जाणून घ्या आजच्या ‘मत्स्य जयंतीबद्दल’

चैत्र शुक्ल तृतीया "भगवान विष्णूंचा पहिला अवतार मत्स्य अवतार"

जाणून घ्या  आजच्या  ‘मत्स्य जयंतीबद्दल’

आज चैत्र महिना शुक्ल पक्षाची तृतीयेची तिथी असून आज ‘मत्स्य जयंती’ अर्थात भगवान विष्णू यांच्या मत्स्य अवताराची पूजा केली जाते. असे म्हंटले जाते कि, या दिवशी भगवान विष्णू यांनी दुपारी पुष्यभद्राच्या तीरावर मत्स्यरूप धारण केले होते. त्याचीच तिथी आणि पूजेची शुभ वेळ आज सकाळी दहा ते दुपारी सव्वाचार पर्यंत या वर्षी आहे. भगवान विष्णूचा पहिला अवतार म्हणजे मत्स्य अवतार. यात भगवान विष्णू यांनी माशाचे रूप धारण करून राक्षसपुत्राकडून पुन्हा वेद प्राप्त केले होते. सनातन हिंदू धर्मात पुराणांना विशेष स्थान आहे. यामुळे देवाचे स्वरूप , जीवांची तत्वे आपल्याला कळतात. हिंदू धर्मात एकूण १८ पुराणे आहेत ज्याची संकलने महर्षी वेद व्यास यांनी केली आहेत. १८ महापुराणे ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींवर आधारीत असून प्रत्येकाला सहा सहा अशी ती समर्पित आहेत.

भगवान विष्णू हे जगाचे पालनकर्ते असून ज्यावेळेस पृथ्वीवर संकट आले तेव्हा त्यांनी पृथ्वीवर अवतार घेऊन या विश्वाला अधर्मापासून वाचवले आहे. एकदा ब्रह्माजींच्या निष्काळजी पणामुळे हयग्रीव या राक्षसाने वेद गिळले होते. असुराच्या या कृत्यामुळे संपूर्ण जगात ज्ञानाचा अंत झाला. आणि पृथ्वीवर सगळीकडे पाप आणि अधर्म पसरला. म्हणूनच विश्वाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यांनी माशाचा अवतार घेतला होता. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्ध्य देण्याची पद्धत आहे. या दिवशी पिवळ्या रगांचे वस्त्र घालून भगवान श्री हरी विष्णू ची मूर्ती स्थापन करण्यात येते. देवाला पिवळे वस्त्र परिधान करून, चंदनाचा टिळा  , फुले, अक्षता वाहाव्यात आणि नंतर विष्णूच्या मत्स्य  अवताराची पूजा आणि पठण करून प्रसाद वाटप करावे.

मत्स्य अवताराशी संबंधित पौराणिक कथा
भगवान विष्णू यांनी सृष्टीचा विनाश होणार होता , प्रलय येणार होता तेव्हा मनू महाराज कृतमाळा नदीमध्ये स्नानासाठी गेले असता, संध्यावंदन करत असताना सूर्याला अर्ध्य देत होते. तेव्हाच त्यांच्या हातात एक छोटासा मासा आला. तो मासा ते परत नदीत सोडणार तेवढ्यात तो मासा म्हणाला , “महाराज मला इथे सोडू नका. येथे मोठे प्राणी आहेत जे मला खातील” आणि मग त्या मनू महाराजांनी त्या माश्याला परत कमंडलू मध्ये ठेवून राजवाड्यात आणले. एका रात्रीत त्या माशाचा आकार इतका वाढला कि कमंडलूमध्ये पुरेशी जागाच उरली नाही. म्हणून मनु महाराजांनी एका मोठ्या घागरीमध्ये मासा ठेवला पण दुसऱ्या दिवशी त्याचा आकार आणखीन वाढला. त्याला ती पण जागा कमी पडू लागल्याने त्याला नंतर तळ्यात सोडण्यात आले.

पण तळ्यात सुद्धा त्याला जागा छोटी पडू लागली. म्हणून त्याला गंगा नदीत सोडण्यात आले.  त्याचा आकार वाढतच  होता म्हणून त्याला  समुद्रात सोडले तर समुद्रामध्ये सुद्धा त्याला जागा कमी पडू लागली त्याचा आकार वाढतच होता. शेवटी मनुमहाराज म्हणाले भगवान मत्स्य रूपाने आपल्याला मोहित करणारी सामान्य अशी शक्ती तुम्ही असूच शकत नाहीत. तूम्ही सर्व शक्तिमान, सर्वव्यापी, भगवान विष्णूच आहांत. देवा तुम्ही माशाचे रूप का घेतले ते कृपया सांगा?. तेव्हा माशाच्या रूपातील भगवान विष्णू म्हणाले कि आता प्रलयाची वेळ आली आहे. संपूर्ण पृथ्वी हि पाण्यात बुडणार असून तू एक भक्कम अशी होडी बनवून त्यावर चढून सात ऋषी, बरोबर बीज, भूत, औषधी वगैरे घेऊन माझी वाट बघत बस. जेव्हा संकट येईल तेव्हा मी प्राण वाचविन. त्या प्रलयाच्या दिवसामध्ये तुझी होडी माझ्या शिंगाला बांधून ती सुरक्षित ठिकाणी घेऊन या विश्वाची निर्मिती कर.

हे ही वाचा:

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये

आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी

अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…

तेव्हा मनू महाराज म्हणाले कि हा प्रलय कधी येणार आहे. मी सर्व सजीवांचे कशा प्रकारे रक्षण करू त्यावर भगवान विष्णू म्हणाले कि, आता शंभर वर्षानंतर पृथ्वीवर पाऊस पडणार नाही , भयंकर दुष्काळ पडेल अनेक संकटे येतील आणि हि पृथ्वी जाळून खाक होईल. त्या अग्नीच्या द्रवामधून निर्माण झालेल्या पाण्याचा मुसळधार पाऊस पडून पृथ्वी बुडेल. त्यावेळेस या वेदरूपी नौकेमध्ये तुम्ही सर्व जीव, बियाणे, आणि औषधी चा भार टाका आणि मी दिलेल्या दोरीने हि होडी माझ्या शिंगाला बांधा. माझ्या प्रभावामुळे तुम्ही सगळे सुरक्षित राहाल. या नौकेमध्ये मी, नर्मदा नदी, चारही वेद, महर्षी मार्केंडेय , पुराण, जगाचा उद्धार या प्रलयामध्ये तुझ्याबरोबर या नौकेत असेल. असे म्हणून भगवान विष्णू माशाच्या रूपात अंतर्धान पावले.

प्रलयाच्या शेवटी देवाने असुर हयग्रीवाचा वध केला आणि त्याच्याकडून वेद परत घेतले. आणि ब्रह्माजींच्या स्वाधीन केले. यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होऊ लागला आणि पृथ्वी दिसू लागली. यानंतर ब्रह्माजींनी मानसी विश्वाची निर्मिती केली आणि दक्ष प्रजापती याने जगाचा विकास करू लागला. राजा सत्यव्रत सातवा वैवस्वत मनू झाला. ज्याचा काळ अजून सुद्धा चालू असून आपण सर्व त्या मनुची मुले आहोत.

 

Exit mobile version