कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार खेळाडू सुनिल नरेन याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोलकाता संघाने रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला धुळ चारली आहे. या विजयामुळे कोलकाता संघाने आयपीएल २०२१ च्या अंतिम फेरीच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकले आहे. तर कर्णधार विराट कोहलीच्या बँगलोर संघाचा आयपीएल २०२१ मधील प्रवास संपुष्टात आला आहे.
सोमवार, ११ ऑक्टोबर रोजी रॉयल चॅलेंजेस बँगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांमध्ये आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना रंगला होता. बँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण कोलकाता संघाचा स्पीनर सुनील नरीन याने बँगलोरची पुरी दाणादाण उडवली. त्यानी चार षटकांमध्ये किवळ २१ धावा देत बँगलोरचे चार प्रमुख फलंदाज बाद केले.ज्यामध्ये कर्णधार विराट कोहली, श्रिकर भरत, ग्लेन मॅक्सवेल, आणि ए बी डिव्हिलियर्स यांचा समावेश आहे. बँगलोर कडून फलंदाजी करताना विराट कोहलीचा ३९ धावांचा अपवाद वगळता कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे बँगलोरचा संघ धावफलकावर २० षटकात केवळ १३८ धावा चढवू शकला.
१३९ धावांचे विजयी लक्ष्य घेऊन कोलकाता संघ मैदानात उतरला. कोलकाताचे सलामीवीर शुभमन गिल (२९) आणि व्यंकटेश अय्यर (२६) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. तर मधल्या फळीत नितेश राणा (२३) आणि सुनील नरीन (२६) यांनी कोलकाता संघाचा डाव सावरला. या सर्वांच्या योगदानामुळे कोलकाता संघाने बँगलोरला चार गडी राखून मात दिली.
या विजयामुळे कोलकाता संघ आयपीएल २०१९ चा पुढच्या फेरीत म्हणजे दुसऱ्या क्वालिफायरसाठी पात्र झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स दुसरा क्वालिफायर सामना रंगेल. या सामन्यात जिंकणारा संघ आयपीएल २०२१ चा अंतिम फेरीत जाणार आहे. तिथे त्यांचा मुकाबला चेन्नई सुपर किंग्सशी होईल.