स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून हकालपट्टी करण्यात आलेले अभिनेते किरण माने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी माने यांनी सर्व घटनाक्रम शरद पवार यांच्यासमोर मांडला आहे. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटर येथे ही भेट झाली असून दोघांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाली आहे.
अभिनेत्री किरण माने हे समाज माध्यमांवर चांगलेच सक्रिय असून आपली राजकीय मते सातत्याने मांडत असतात. अनेकदा त्यांनी विरोधी विचारांच्या लोकांना शिवीगाळ केल्यासही स्क्रीनशॉट सध्या समाज माध्यमांवर फिरत आहेत. आपण राजकीय मते मांडत असल्यामुळेच आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून डच्चू देण्यात आल्याचे आरोप किरण माने यांनी केले आहेत. तर माने यांना काढण्या मागचे कारण हे पूर्णतः व्यावसायिक असल्याचे मालिकेचा निर्मात्यांकडून सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
पहिल्या तीन महिन्यात जाहिरातींसाठी राज्य सरकार खर्च करणार १६ कोटी
मुंबई महापालिकेत जाधव, चहल, वेलारसु यांची ‘वाझेगिरी
किरण मानेंची हकालपट्टी व्यावसायिक कारणांमुळेच
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; शेलारांची मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती
या सर्व प्रकरणासंदर्भात किरण माने यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. याविषयी माहिती देताना आपल्यावर जो अन्याय झाला त्याबाबत शरद पवार यांच्याशी बोलायला हवं असं मला वाटलं म्हणून मी आज त्यांची भेट घेतल्याचे किरण माने यांनी सांगितले. तर आपल्यावर झालेला अन्याय म्हणजे सांस्कृतिक दहशतवादाचे एक उदाहरण असल्याचेही माने यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आपण भाजपच्या वरिष्ठ लोकांशीही बोलणार असल्याचे माने यांनी सांगितले. माझ्यावर एका महिलेने आरोप केल्याचे सांगण्यात येत आहे. तसं असेल तर यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला नाही असा सवाल माने यांनी केला आहे.
शरद पवार यांनी मानेंची बाजू सविस्तर ऐकून घेतली आहे. पण अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे शरद पवार या विषयात नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.