गणरायाच्या आगमनास आता काही मोजकेच दिवसच उरलेले आहेत. सर्व गणेशभक्तांना कधी एकदा गणेशोत्सव सुरू होतोय, अशी आतुरता आणि आस लागून राहिली आहे. आनंद उत्साह आणि जल्लोषाचं प्रतिक असलेला सण म्हणजे गणेशोत्सव. गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आणणारा हा आपला लाडका देवबाप्पाचा सण. मुंबईतील गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. गणेश मंडळं भव्य देखावे तयार करतात. आपल्या लाडक्या बाप्पाला डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने मंडळांना भेट देत असतात. गणेश मंडळं सुंदर देखावे तयार करतात. त्यातील काही मंडळांना ‘न्यूज डंका’ भेट देणार आहे. त्या मंडळाची वैशिष्ट्ये, इतिहास, सामाजिक कार्ये, मिरवणूक याविषयी या लेखमालेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. यंदा आवर्जून भेट द्यावी अशी मुंबईतील गणेश मंडळं. चला तर मग जाणून घेऊया, प्रभादेवीतील ‘कपिला परिवार मित्र मंडळा’चा लाडका बाप्पा ‘खेडगल्लीचा विघ्नहर्ता’ या मंडळाविषयी.
प्रभादेवी भागातील खेडगल्लीमधील कपिला परिवार मित्र मंडळाचे हे ७५ वे वर्ष. अमृत महोत्सवी वर्षात या परिवाराचे पदार्पण असल्यामुळे हे मंडळ यंदा मोठ्या दिमाखात गणेशोत्सव साजरा करणार आहे. या उत्साहाला प्रभादेवीसारख्या गिरणगावात असलेल्या चाळीपासून सुरू झाली आहे. आता हा बाप्पा स्थापन्न झाला आहे तो गगनचुंबी इमारतीत. कपिला परिवारातील ज्येष्ठ मंडळींसोबत हा उत्सव तरुण मंडळी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत असतात.
हा सण दणक्यात कसा साजरा केला जाईल. गणरायाचे आगमनापासून विसर्जनापर्यंत गणेशोत्सवाचे वेगळेपण कसे जपता येईल, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची धडपड पाहायला मिळते. गणपतीला लागणारा खर्च रहिवाश्यांच्या वर्गणीतूनच केला जातो.
गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी श्रींचे आगमन केले जाते. यंदा अमृत महोत्सवी वर्ष असल्याने वाजत-गाजत मोठ्या दिमाखात श्रींचे आगमन होणार आहे. त्यासाठी वेगळी थीम आखली गेली आहे. महिनाभर अगोदरच श्रींचे आगमन कसे करावे, सजावट काय असावी, वर्गणी किती यांसारख्या अनेक विषयांवर कार्यकारीणी मिटींगमध्ये एकमताने ठरवले जाते. वरिष्ठांचे मत घेऊनच वर्गणी किती काढावी हे ठरवले जाते, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
संपूर्ण खेडगल्ली विभागात आगमनाचा ध्यास सुरू करणारे हे एकमेव मंडळ आहे. महाप्रसाद भंडारा स्वरूपात अन्नदान केले जाते. विभागातील प्रत्येक मंडळाचा एकोपा धरून ठेवणे आणि विभागातील भक्तगण विभागातच उत्सवाचा आनंद घेऊ शकतील, याचे नियोजन करणे हे या मंडळाचे खास वैशिष्ट आहे.
येत्या काळात प्रभादेवी विभागातील सर्व गणेश मंडळांना एकत्रित घेऊन येण्यास व लालबाग-परळसारखा उत्साह हिंदू बहुल जो भाग म्हणून ओळखला जातो, त्या प्रभादेवीत निर्माण करून भव्य पुष्वृष्टी उपक्रमाद्वारे निर्माण करू, असे मंडळाचे कार्यकर्ते सागर सुर्वे यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सव काळात अनेक कार्यक्रम राबवले जातात. हे युग स्पर्धेचे असल्याने त्याचा विचार करून रहिवाशांना आपली कला सादर करता यावी, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, गायन स्पर्धा, नृत्य, चित्रकला, संगीत खुर्ची यासारखे अनेक स्पर्धा घेतल्या जातात. या मंडळाच्या महिलांचा सहभाग वाखणण्याजोगा असतो. मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग या मंडळात आहे. महिलांसाठी अनेक कार्यक्रम यंदा राबवण्यात येणार आहेत. मंगळागौरीपासून, डान्स यासारखे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने असतो. स्त्रियांसाठी हळदी कुंकू व भेटवस्तू देऊन गौरवले जाते.
सजावट करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही या सारख्या अनेक गोटींचा विचार करूनच साधे पण आकर्षक कसे होईल, याकडे मंडळाचा ध्यास असतो. थर्माकॉल, प्लास्टिकचा वापर टाळला जातो. कपिला मित्र मंडळाने विभागातील सर्व मंडळांना एकत्रित करून, सामाजिक बांधिलकी जपणारा संदेश दिला आहे आणि ह्या पुढे पण जपलं जाईल, असे मंडळाचे कार्यकर्त्यांचे मत आहे. सोशल मीडियाच्या जगात हे मंडळ सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर khedgallicha_vighnaharta या नावाने हे मंडळ सक्रीय आहे.
बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात केली जाते. कोविड काळात सर्व नियमांचे पालन करून हा सण साजरा केला गेला. परंतु हे वर्ष अमृत महोत्सवी असल्याने यंदाची मिरवणूक मोठ्या दिमाखात निघणार आहे, ती सुद्धा पारंपरिक पद्धतीने.