कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार !

कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त करतानाच ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (९ ऑगस्ट) दिली. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आवश्यक खर्चाची तरतूद सरकारकडून केली जाईल, असे ते म्हणाले. या घटनेची संपूर्णपणे चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग अत्यंत वेदनादायी आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेमुळे राज्यातील कलाप्रेमी दुःखी झाले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू अनेक दर्जेदार कलाकृती आणि कलाकारांच्या सादरीकरणाची साक्षीदार होती. केशवराव भोसले यांची आज जयंती असून पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडणे वेदनादायी आहे. ही वास्तू पुन्हा एकदा दिमाखात उभी राहील आणि येथे कलाकृती सादर होत राहतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोल्हापूरला कलेचा वारसा आहे. अनेक कलाकार येथे घडले, त्यांच्या आठवणी वास्तूशी जोडलेल्या होत्या. त्यामुळेच ही वास्तू आगीत भस्मसात होणे, ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक हानी आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. येथील कलेच्या वास्तू, कलाकार आणि कला या साऱ्याची जपणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा :

दिल्ली दरबारी जाऊन, भजन, पाद्यपूजन करून चरणामृत घेऊन आले, परंतु कटोरा रिकामाच !

होर्डिंग कोसळल्याची दुर्घटना ‘देवाचे कृत्य’; भावेश भिंडेचा दावा फेटाळला

‘बांगलादेशात कट्टरवाद्यांमुळे स्मशानभूमीही शिल्लक नाहीत’

‘महाराष्ट्रातील जनतेने उबाठाची लाचारी बघितली’

दरम्यान , कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला काल रात्री आग लागली होती. त्यामुळं कोल्हापूरचा सांस्कृतिक वारसा असलेलं कलामंच आगीतच जळून खाक झाल्यानं कोल्हापुरकरांना अश्रू अनावर झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची वास्तू खुद्द छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकारानं बांधण्यात आली होती. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Exit mobile version