एका येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या केरळमधील महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिच्या आईला येमेनमध्ये जाण्याची परवानगी दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिली. मात्र तिने स्वतःच्या वैयक्तिक जोखमीवर आणि जबाबदारीवर तिथे जावे, याबाबत भारत सरकार किंवा राज्य सरकार कोणतीही जबाबदारी घेणार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
येमेनी कायद्यानुसार, ज्याची हत्या करण्यात आली आहे, त्याच्या कुटुबीयांना पैसे दिल्यास दोषी व्यक्तीची शिक्षेतून मुक्तता होऊ शकते. त्यामुळेच निमिषा प्रिया या मुलीला वाचवण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी तिची आई प्रेमा कुमारी यांनी येमेनला जाण्यास परवानगी मिळावी, अशी याचिका दाखल केली होती. न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांनी केंद्र सरकारला त्यांची सन २०१७ची अधिसूचना शिथिल करण्याचे निर्देश दिले. या अधिसूचनेनुसार, कोणत्याही भारतीय पासपोर्टधारक व्यक्तीला येमेनमध्ये जाण्यास परवानगी नाही. मात्र याचिकाकर्तीने आपण मुलीची सुटका करण्यासाठी स्वतःच्या जोखमीवर जात असल्याचे आणि याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारची कोणतीही जबाबदारी नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्या. सुब्रम्हण्यम प्रसाद यांनी दिले.
हे ही वाचा:
काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल
शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!
भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री!
कमाल झाली ! बसतिकिटाची मशीन चोरणाऱ्या चोरानेच कंटक्टरला विचारले तिकीट
केंद्र सरकारने भारत आणि येमेन यांच्यात राजनैतिक संबंध नसल्याचे आणि तेथील भारताचा दूतावासही बंद करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, सद्यपरिस्थितीत येमेनमध्ये कोणताही आंतरराष्ट्रीय करारही लागू नसल्याचे नमूद केले होते. उच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे हे म्हणणे ऐकून निर्णय दिला.निमिषाप्रिया हिची आई प्रेमा कुमारी यांनी ही याचिका दाखल केली होती. हत्या झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला ‘ब्लड मनी’ भरपाई देण्यासाठी तिला आणि अन्य तिघांना येमेनमध्ये जाण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका त्यांनी दाखल केली होती.
निमिषा प्रिया हिने मृत्युदंडाविरोधात दाखल केलेली याचिका येमेनच्या सर्वोच्च न्यायालयाने १७ नोव्हेंबरला फेटाळून लावली. ती येमेनमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. तिला तलाल अब्दो मेहदी याची हत्या केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. त्याच्याकडे असलेला पासपोर्ट हस्तगत करण्यासाठी निमिषाने जुलै २०१७मध्ये निमिषाने त्याला वेदनाशामक औषधे देऊन त्याची हत्या केली होती. तो बेशुद्धावस्थेत गेल्यानंतर त्याच्याकडे असलेला तिचा पासपोर्ट घेण्याचा तिचा हेतू होता. मात्र ओव्हरडोस झाल्याने त्याचा मृत्यू झाला.