मुसळधार पावसाने उत्तरेकडील राज्यांना झोडपून काढलं असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे उत्तराखंडमध्येही पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, केदारनाथला जाणाऱ्या मार्गावर ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे केदारनाथला जाणारी पदयात्रा स्थगित करण्यात अली आहे. शिवाय पदयात्रेच्या मार्गावरच ढग फुटल्याने साधारण २०० यात्रेकरू अडकल्याचे वृत्त समोर आले आहे.
केदारनाथ मार्गावरील लिनचोलीजवळ ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. ढगफुटीमुळे काहीच क्षणात मंदाकिनी नदीची जलपातळी वाढली असून ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून सुदैवाने अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही. केदारनाथ यात्रा मात्र सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आली आहे. या पदयात्रेतील मार्ग असलेल्या परिसरात भूस्खलन होऊन रस्त्याचा ३० मीटरचा भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरील दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी एक बचाव पथक घटनास्थळी पाठवले आहे.
VIDEO | Cloudburst reported in Uttarakhand's Kedarnath, several feared trapped. Details awaited.
(Source: Third Party) pic.twitter.com/dRlLi2vvls
— Press Trust of India (@PTI_News) July 31, 2024
दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या सचिवांना फोन करून दुर्घटनाग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांच्याकडून सातत्याने बचावकार्याबाबतची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. तसेच इतर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनाही २४ तास अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा न्यायदंडाधिकारी सौरभ गहरवार यांच्या आदेशानुसार केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. यात्रेकरूंना हेलिपॅड आणि इतर सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.
हे ही वाचा:
हिमाचलमध्ये ढगफुटी; पुराच्या पाण्यात ३६ जण गेले वाहून
वायनाड भूस्खलनात २५६ जणांचा मृत्यू; १९० नागरिक अद्यापही बेपत्ता
‘वहाबी अतिरेकी दहशतवादी संघटनां’वर राष्ट्रहितासाठी बंदी घाला
वायनाड दुर्घटनेवर अमित शहा म्हणाले, ‘इशारा देऊन देखील केरळ सरकारचे दुर्लक्ष’
याशिवाय हिमाचल प्रदेशमध्येही ढगफुटी झाली आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ३६ लोक बेपत्ता आहेत. हिमाचल प्रदेशात पुढच्या ३६ तासांमध्ये १० जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. बिलासपुर, चंबा, हमीरपुर, कांगड़ा, कुल्लू, मंडी, शिमला, सिरमौर, सोलन आणि ऊना येथे गुरुवार आणि शुक्रवारी दिवसभर पाऊस कोसळण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.