जगभर धुमाकूळ घालत असलेल्या काश्मिर फाईल्स या चित्रपटाने आपल्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोचला आहे. काश्मिर फाईल्स या चित्रपटने तिकीट बारीवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाने भारतात २०० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे. या कमाईसह काश्मिर फाईल्स चित्रपटाने रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. कोविड महामारीनंतर थिएटरमध्ये सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.
विवेक अग्निहोत्री लिखित-दिग्दर्शित काश्मीर फाईल्स हा चित्रपट यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करताना दिसत आहे. काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराचे वास्तव या चित्रपटातून उलगडण्यात आले आहे. ज्याला प्रेक्षकांची भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाच या चित्रपटाकडून एवढी अपेक्षा नव्हती. पण देशभरातील प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरला. त्यामुळेच थिएटर मालकांनाही या चित्रपटाचे खेळ वाढवणे भाग पडले.
हे ही वाचा:
विधानसभेत एकमताने ‘शक्ती कायदा’ मंजूर
पुण्यातील फार्मा कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला
या चित्रपटाला आता दोन तवंडे होत आले आहेत तरी देखील चित्रपटाला मिळणार प्रतिसाद कमी व्हायचे नाव घेत नाहीये. हा चित्रपट बघण्यासाठी चित्रपटगृहात लोक गर्दी करत आहेत. या चित्रपटाच्या अनेक शो ना हाऊसफुलचा बोर्ड लागत आहेत. आठवड्यातल्या मधल्या वारांमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. बुधवार, २३ मार्च रोजी या चित्रपटाने देशभरातून १० कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाचा हा १३ वा दिवस होता. या कलेक्शनसह चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भारतातून २०० कोटींपेक्षा अधिकचा गल्ला जमवला आहे.
सत्य घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटात कोणताही मोठा सुपरस्टार नाही, किंवा चित्रपटाच्या निर्मितीचे बजेटही फार नव्हते. तरीदेखील काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची कथा समजून घ्यायला लोक या चित्रपटाला गर्दी करत आहेत.