करोनाच्या संकटकाळात लॉकडाउनमध्ये तहान भूक हरपून काम करत असलेल्या पोलिसांप्रती आपलेही काही कर्तव्य आहे, या भावनेतून प्रशांत कारूळकर आणि शीतल कारूळकर या दांपत्याने कारूळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून या संकटकाळात पोलिसांना ताजी न्याहारी, पाणी, आरोग्यदायी पेयपुरवठा करण्याची चोख व्यवस्था केली आहे.
हे ही वाचा:
बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा
कोल्हापुरात १५ मे पर्यंत लॉकडाऊन
नागपूरमधील इंटर्न डॉक्टर संपावर; रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता
ठाणेकरांसाठी भाजपातर्फे प्लाझ्मा हेल्पलाईन
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत करोनामुळे अनेक पोलिस राज्यभरात मृत्युमुखी पडले, पोलिसांवरील ताणही दिवसागणिक वाढतो आहे. लॉकडाउनच्या कालावधीत बदलणारी नियमावली, घातलेले निर्बंध यानुसार काम करताना पोलिसांची प्रचंड ओढाताण होते आहे. अशा परिस्थितीत त्यांना वेळच्यावेळी जेवण, न्याहारी मिळणेही मुश्किल होते. त्यात मे महिन्यातील कडक उकाड्यात पाण्याचीही वानवा त्यांना भासते. हे लक्षात घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कारूळकर प्रतिष्ठानने पहिल्या लॉक डाउनमध्ये मदतीचा हात दिला. राज्य सोडून जाणारे मजूर, कर्तव्य बजावणारे पोलीस आणि वनवासी क्षेत्रातील बांधवांसाठी भरीव मदत केली. आता राज्यात लागू करण्यात आलेल्या दुसऱ्या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवसापासून कारूळकर प्रतिष्ठान पोलिसांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहे.
उपमा, पोहे, बटाटावडा, वडापाव असा ताजा नाश्ता पोलिसांना देण्याचे काम प्रतिष्ठानच्या वतीने अविरत सुरू आहे. दहिसर, मिरा रोड, बोरिवली, समतानगर अशा विविध भागातील पोलिस स्टेशन्स, टोल नाके आणि रस्त्यांवर नाकाबंदीसाठी उभे असलेल्या पोलिसांना हे खाद्यपदार्थ, पाणी, शीतपेय यांचा पुरवठा केला जात आहे. प्रतिष्ठानचे स्वयंसेवक हे काम अथक करत आहेत. यासंदर्भात प्रशांत कारूळकर यांनी सांगितले की, ‘करोनाकाळात आम्हीही पोलिसांसोबत आहोत, हे दाखवून द्यायचे होते. त्यामुळे त्यांना खाद्यपदार्थांचा पुरवठा करून त्यांना दिलासा मिळावा हा हेतू होता. तासनतास रस्त्यांवर, नाकाबंदीत उभे असलेल्या पोलिसांना पाण्याची अधिक गरज आहे. ती आम्ही भागविण्याचा प्रयत्न करतो आहोत. पोलिसांना हॅण्डग्लव्हज, मास्कचाही पुरवठा आम्ही करणार आहोत.’
पोलिसांना या सुविधा देताना गुजरात अहमदाबाद रस्त्यावरील रस्त्यांवरील ट्रक चालक, टेम्पो चालक यांनाही हा नाश्ता उपलब्ध करून दिला जात आहे, असेही कारूळकर म्हणाले.