‘पाकिस्तान कदाचित भाजपसाठी शत्रूराष्ट्र असेल, परंतु काँग्रेस त्यांना केवळ शेजारी राष्ट्र मानतो,’ असे विधान कर्नाटक विधानपरिषदेचे आमदार बीके हरिप्रसाद यांनी बुधवारी केल्याने नवा वाद उफाळून आला आहे. भाजपनेही त्यावर जोरदार टीका करून काँग्रेस पक्ष ‘राष्ट्रविरोधी भावनां’ना उत्तेजन देत असल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकमधील राज्यसभेच्या जागेवर काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर मंगळवारी तेथे पाकिस्तानिरोधी घोषणा दिल्या गेल्याचा आरोप आहे.
‘ते आमच्या शत्रूराष्ट्रासोबतच्या नात्याबाबत बोलतात. त्यांच्या मते, पाकिस्तान शत्रूराष्ट्र आहे. परंतु आमच्यासाठी पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र नव्हे; ते आमचे शेजारी राष्ट्र आहे. ते म्हणतात पाकिस्तान आमचे शत्रूराष्ट्र आहे. ज्यांनी लाहोर येथील जिन्ना यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली, त्या लालकृष्ण अडवाणी यांना त्यांनी भारतरत्न जाहीर केले. त्यांच्यासारखा धर्मनिरपेक्ष नेता कोणीही नाही, असे तेव्हा सांगण्यात आले होते. तेव्हा पाकिस्तान हे शत्रूराष्ट्र नव्हते का?,’ असा प्रश्न हरिप्रसाद यांनी उपस्थित केला.
कर्नाटक आमदाराच्या या वक्तव्यावर कर्नाटक भाजपने सडकून टीका केली आहे. ‘पाकिस्तानबाबतचा काँग्रेसचा दृष्टीकोन काय आहे, हे बी. के. हरिप्रसाद यांनी राज्यसभेत स्पष्ट करावे. विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासह चारवेळा भारताविरुद्ध युद्ध घोषित करणारा पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र नाही असे म्हणणाऱ्या काँग्रेसजनांच्या मानसिकतेचा अवमान केला तर शब्द अपुरे पडतील,’ अशी टीकाही भाजपतर्फे करण्यात आली.
हे ही वाचा:
जीएसटी परतावा १७५ कोटींचा घोटाळा, विक्रीकर अधिकऱ्यासह १६ कंपन्यांवर गुन्हा दाखल
माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चेन्नी गोल्डी ब्रारचे लक्ष्य
गुन्हे दाखल असूनही शेख शहाजहान नेहमीच सहीसलामत
कर्नाटकात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्या; फॉरेन्सिक अहवालात स्पष्ट
काँग्रेसचे नेते सय्यद नासीर हुसैन हे मंगळवारी कर्नाटक राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कर्नाटक विधानसभेतच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. मात्र काँग्रेसचे समर्थक नासीरसाब जिंदाबाद असे म्हणत होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
केंद्रीय मंत्र्यांचे गृहमंत्र्यांना पत्र
या घटनेची राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ज्यांनी विधानसभेत पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या, ते कदाचित प्रतिबंधित अशा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ संघटनेचे सदस्य असू शकतात आणि ते आता काँग्रेसमध्ये सहभागी झाले असतील, असा दावा करंदालजे यांनी केला आहे.