कृत्रिम खाद्यरंगांमुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याने कर्नाटक सरकारने सोमवारी ऱ्होडामाइनसह कृत्रिम खाद्यरंगावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवास अथवा १० लाखांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडु राव यांनी स्पष्ट केले आहे. संपूर्ण राज्यभरात विकले जाणारे कॉटन कँडी आणि कोबी मंच्युरियन यांचा दर्जा खाद्यरंगांच्या वापरामुळे अतिशय वाईट असल्याचे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असल्याचे आढळून आल्याने ही बंदी घातली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यभरात कोबी मंच्युरियनचे १७१ नमुने जमा करण्यात आले. त्यातील ६४ वगळता १०६ नमुने आरोग्यदृष्ट्या हानीकारक होते. तर, कॉटन कँडीचे १५ नमुने हानिकारक तर, १० खाण्यासाठी सुरक्षित होते. या नमुन्यांत टार्ट्राझाइन, कार्मोइझाइन, सनसेट यलो आणि ऱ्होडामाइन-१ बी यांसारखे कृत्रिम रंग वापरल्याचे आढळले आहे. ‘हे सर्व नमुने हॉटेल, रस्त्यालगतची दुकाने आदींकडून जमा करण्यात आले. त्यातील अनेक नमुने आरोग्यासाठी हानिकारक होते. ऱ्होडामाइनचा वापर खाद्यरंग म्हणून वापरण्यास बंदी आहे. अनेक हॉटेले अन्नपदार्थ गडद लाल दिसावा, म्हणून या रंगाचा वापर करतात,’ असे दिनेश गुंडु राव यांनी सांगितले. त्यामुळे कोबी मंच्युरियन आणि कॉटन कँडीमध्ये ऱ्होडामाइन बी सह अन्य कृत्रिम रंग वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या खाद्यरंगाचा समावेश असलेल्या खाद्यपदार्थांचे दीर्घकाळ सेवन केल्यास कर्करोगासारखे असाध्य आजार होण्याचा धोका वाढतो, असेही त्यांनी नमूद केले आहे.
हे ही वाचा..
भाजप आंध्र प्रदेशात सहा जागा लढवणार
डीआरडीओचे ”मिशन दिव्यस्त्र” यशस्वी, पंतप्रधान मोदींकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन!
शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक
मविआ सरकार म्हणजे खोडा-काडी सरकार!
राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी या संदर्भात राज्यभरात एक आदेश जाहीर करून कोबी मंच्युरियन आणि कॉटन कँडीमध्ये कोणत्याही कृत्रिम रंगावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. कोबी मंच्युरियनचे काही नमुने कर्नाटकातील थ्री-स्टार हॉटेलमधून घेण्यात आले होते आणि तेही असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले. गेल्याच महिन्यात गोव्याने हे पाऊल उचलले होते. गेल्या महिन्यात, मापुसा नगरपरिषदेने कोबी मंच्युरियनवर बंदी घातली होती. तर, तमिळनाडू आणि पुद्दुचेरीने गेल्या महिन्यात कॉटन कँडीविरूद्ध पावले उचलली. चाचणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांमध्ये कर्करोगाला कारणीभूत ठरणारे ऱ्होडामाइन-बी हे रसायन असल्याच्या कारणावरून दोन्ही ठिकाणी खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली.