कर्नाटकमध्ये चिकन कबाब, माशांच्या पदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यास बंदी!

कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी दिली माहिती

कर्नाटकमध्ये चिकन कबाब, माशांच्या पदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यास बंदी!

कर्नाटक सरकारने सोमवारी राज्यात चिकन कबाब आणि माशांच्या खाद्यपदार्थांत कृत्रिम रंग वापरण्यावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या पदार्थांच्या नमुन्यांच्या दर्जाची तपासणी केल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. कृत्रिम रंगांमुळे अन्नपदार्थांचा दर्जा कमी होत असल्याचे आढळून आले आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करून हा बंदीचा आदेश देण्यात आल्याचे कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी सांगितले.

आरोग्य मंत्र्यांनी अन्न सुरक्षा विभागाच्या आयुक्तांना अन्नपदार्थांवर कृत्रिम रंगांच्या दुष्परिणामांबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी, राज्याच्या अन्न आणि सुरक्षा गुणवत्ता विभागाने राज्य प्रयोगशाळांमधून कबाबचे ३९ नमुने गोळा केले आणि त्यांचे विश्लेषण केले. कृत्रिम रंग वापरल्यामुळे ३९ पैकी आठ नमुने वापरासाठी असुरक्षित असल्याचे आढळले.

हे ही वाचा:

‘बंगाल सरकारने खोटे वृत्त पसरवले’

यूपीएससीद्वारे आयोजित परिक्षांवर ‘एआय’ आधारित सीसीटीव्ही यंत्रणेची असणार नजर

अनधिकृत हज यात्रेकरूंना सौदीला पाठविणाऱ्या बेजबाबदार ट्रॅव्हल कंपन्यांचे परवाने इजिप्तकडून रद्द

आता कसं वाटतंय… एकटं एकटं वाटतंय

या बंदीचे उल्लंघन केल्यास अन्नपदार्थ विक्रीचा परवाना रद्द करण्यासह किमान सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि १० लाख रुपयांच्या दंडासह जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, २००६ अंतर्गत तपासणीसाठी घेतलेले नमुने असुरक्षित असल्याचे नोंदवले गेले. अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न उत्पादने मानके आणि अन्न जोड) नियम, २०११ नुसार, कोणत्याही कृत्रिम रंगांचा वापर करण्यास मनाई आहे. राज्य सरकारने याआधी गोबी मंचुरियन आणि खाण्याच्या कापसामध्ये कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले होते.

Exit mobile version