कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने जम्मू- काश्मीरच्या दाैऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा भाग आहे आणि त्या संदर्भात संसदेत सर्वसंमत असा प्रस्तावही मंजुर झाला आहे. शेवटी शिवस्वरुप बाबा अमरनाथ भारतामध्ये, पण शक्ती स्वरुप शारदा धाम एलओसीच्या पलिकडे हे कसे चालेल असा स्पष्ट प्रश्न आपल्या भाषणात उपस्थित केला हाेता.
कारगिल विजय दिवस सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रविवारी जम्मूमध्ये कारगिल विजय दिवस साेहळ्यात सहभागी झाले हाेते. यावेळी भारतीय लष्कराच्या हौतात्म्याचे स्मरण करताना ते म्हणाले की, भारताच्या संसदेत पाकव्याप्त काश्मीरवर (पीओके) ठराव मंजूर करण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीर भारताचा एक भाग होता, आहे आणि राहील. पण शिवाचे रूप असलेले बाबा अमरनाथ आपल्यासोबत आणि आई शारदा शक्ती स्वरूप नियंत्रण रेषेच्या पलीकडे हे कसे चालेल असा सवाल त्यांनी यावेळी केला. आज भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होत आहे. आज भारत बोलतो तेव्हा जग ऐकते असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
पाकिस्तानला झाेंबल्या मिरच्या
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या या विधानामुळे पाकिस्तानला चांगल्याच मिरच्या झाेंबल्या आहेत. भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेले वक्तव्य अयोग्य आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने हे पूर्णपणे फेटाळून लावले आणि त्याचा तीव्र निषेध केला. ‘भारतीय राजकारण्याने बेकायदेशीरपणे व्याप्त जम्मू-काश्मीरवर अशी टिप्पणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशी चिथावणीखोर विधाने आयआयओजेके चे वास्तव बदलू शकत नाहीत. भारताने हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की काश्मीर हा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विवादित मुद्दा आहे आणि तो संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावर आहे. आयआयओजेकेच्या लोकांना त्यांचा आत्मनिर्णयाचा अधिकार मिळवून देण्यासाठी पाकिस्तान नेहमीच त्यांना शक्य ती सर्व मदत करत राहील असेही पाकिस्तानने म्हटले आहे.
अमरनाथ प्रमाणे शारदा पीठ यात्रा सुरू करण्याचे प्रयत्न
शारदा पीठ मंदिर अमरनाथ आणि अनंतनागच्या मार्तंड सूर्य मंदिरासारख्या काश्मिरी पंडितांसह संपूर्ण भारतासाठी श्रद्धेचे केंद्र आहे. शारदा पीठाची यात्रा सुरू करण्यासाठी काश्मिरी पंडित भारत आणि पाकिस्तान सरकारला सातत्याने विनंती करत आहेत. उत्तर काश्मीरमधील टिटवाल भागात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) माता शारदा मंदिर आणि केंद्र स्थापनेचे काम सुरू झाले आहे. काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात हे मंदिर पाकव्याप्त काश्मीरमधील शारदापीठ येथे होत असलेल्या शतकानुशतके जुन्या यात्रेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने बांधले जात असल्याचे शारदा बचाओ समितीने म्हटले आहे.
पूजेमध्ये काश्मिरी हिंदूंचा सहभाग
शारदा यात्रा मंदिर समितीने काश्मीरमधील टिटवाल भागात नियंत्रण रेषेजवळ प्राचीन शारदा मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे.बांधकामाच्या ठिकाणी पूजा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये देशाच्या विविध भागांतील काश्मिरी हिंदू सहभागी झाले होते. जमिनीचे सीमांकन करून समितीने डिसेंबर २०२१ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली हाेती. मंदिराच्या डिझाइन आणि मॉडेलला दक्षिणा शृंगेरी मठाने यापूर्वीच मान्यता दिली असून मंदिरात वापरण्यात आलेल्या ग्रॅनाइट दगडांवर शिल्पकलेचे काम कर्नाटकातील बिदाडी येथे सुरू झाले आहे.
सुमारे ५,००० वर्षे जुने शारदा पीठ मंदिर
काश्मिरी पंडितांच्या श्रद्धेचे प्रतीक असलेले शारदा पीठ मंदिर ५०० वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते. आजही या मंदिराबाबत काश्मिरी जनतेसह देशातील हिंदूंच्या, विशेषत: पंडितांच्या मनात वेदना आहेत. शारदा देवी मंदिरात गेल्या ७० वर्षांपासून विधिवत पूजा केली जात नाही. आजही देशभरातील ब्राह्मण (पंडित) अनुष्ठानाच्या वेळी शारदा पीठाला नतमस्तक होतात.
शारदा पीठ म्हणजे काय?
शारदा पीठ म्हणजे शारदा मातेचे स्थान. शारदा देवी हे देवी सरस्वतीचे नाव आहे. त्याला काश्मिरी नावानेही ओळखले जाते. शारदा पीठ मंदिराला धार्मिक तसेच शैक्षणिक महत्त्व आहे.
शारदा पीठ नेमके आहे कुठे?
भारतीय उपखंडातील प्रमुख प्राचीन विद्यापीठांपैकी एक, शारदा पीठ हे सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ किशनगंगा (नीलम) नदीच्या काठावर आहे. श्रीनगरपासून सुमारे १२४, मुझफ्फराबादपासून सुमारे १४० आणि कुपवाडा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३० किलोमीटरवर आहे.