लोकप्रिय कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा आणि त्याची पत्नी पवित्रा गौडा यांना बेंगळुरू येथील रेणुकास्वामी या ३३ वर्षीय व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दर्शनने त्याचा प्रभाव कसा वापरला आणि त्याच्या फॅन क्लबच्या सदस्याला हत्येच्या कटात कसे सामील केले, याचे चित्तथरारक तपशील आता समोर आले आहेत.
पवित्रा गौडा यांना अपमानास्पद संदेश पाठवण्यासाठी रेणुकास्वामी याने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार केल्याचा आरोप आहे. दर्शनचा चाहता असणारा रेणुकास्वामी हा पवित्रा यांच्या विवाहबाह्य संबंधाच्या आरोपामुळे कथितपणे नाराज झाला होता. या विवाहबाह्य संबंधाच्या आरोपामुळे दर्शनची प्रतिष्ठा खराब होत आहे, असा त्याचा समज होता.
रेणुकास्वामी याने पवित्रा यांना पाठवलेल्या अश्लील संदेशांसह या आरोपांचा पोलिस तपास करत आहेत.
चित्रदुर्ग येथील अपोलो फार्मसीमध्ये काम करणारा रेणुकास्वामी बेंगळुरूमधील सुमनहल्ली ब्रिज येथे मृतावस्थेत आढळला. दर्शन फॅन क्लबच्या सदस्याने रेणुकास्वामीचे अपहरण केले. राघवेंद्र, कार्तिक आणि केशवमूर्ती या तीन व्यक्तींनी रेणुकास्वामी याची हत्या करून त्यांचा मृतदेह फेकल्याची कबुली पोलिसांना दिली तेव्हा तपासाला महत्त्वपूर्ण वळण मिळाले.
चौकशीदरम्यान, आरोपींनी खुलासा केला की, त्यांना दर्शनचे नाव न सांगण्याची सूचना देण्यात आली होती आणि आरोपांची कबुली देण्याण्यासाठी त्यांना पाच लाख रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. तसेच, त्यांचा कायदेशीर खर्च पूर्ण केला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते.
पोलिस सूत्रांनुसार, पवित्राने दर्शनला रेणुकास्वामी याने केलेल्या अश्लील टिप्पणीचा बदला घेण्यासाठी प्रवृत्त केले. रेणुकास्वामीबद्दल माहिती जमा करण्यासाठी दर्शनने चित्रदुर्गातील त्यांच्या फॅन क्लबचे संयोजक राघवेंद्र यांना सहभागी करून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.रेणुकास्वामी याची पत्नी सहाना यांनी सांगितले की, घटनेच्या रात्री राघवेंद्रने कथितपणे तिच्या पतीला घराजवळून पळवून नेले आणि कामाक्षिपाल्य येथील एका शेडमध्ये नेले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनने हत्येच्या दिवशी ८ जून रोजी संध्याकाळी या शेडला भेट दिली. दर्शन घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच रेणुकास्वामीवर मोलमजुरी करणाऱ्यांनी हल्ला केला. त्यानंतर दर्शनने रेणुकास्वामीला पट्ट्याने, चाबकाने मारहाण केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.दर्शने निघून गेल्यानंतर गुन्हेगारांनी रेणुकास्वामी यांना पुन्हा मारहाण केली. या गुन्हेगारांपैकी एक असणाऱ्या प्रदोषने दर्शनाला रेणुकास्वामीच्या मृत्यूची माहिती दिली आणि परिस्थिती हाताळण्यासाठी ३० लाख रुपये रोख घेतले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पैसे सुपूर्द केल्यानंतरच कार्तिक आणि त्याच्या टीमने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचे मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रदोषने सुरुवातीला त्यांना पाच लाख रुपये दिले आणि उर्वरित रक्कम चाचणीनंतर देण्याचे आश्वासन दिले.प्रदोषने उर्वरित २५ लाख रुपये कोठे ठेवले ते ठिकाण पोलिसांनी शोधून काढले आहे, सूत्रांनी सांगितले की, पोलिसांनी पंचनामा करून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
डोडामध्ये लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध
जगन्नाथपुरी मंदिराचे सर्व दरवाजे आज उघडणार
भारत विरुद्ध चित्तथरारक सामन्यात अमेरिककडून चूक; पाच धावांची पेनल्टी
अमेरिकेला पराभूत करून भारताची सुपर आठमध्ये धडक
शोध आणि अटक
रेणुकास्वामी यांचा मृतदेह एका फूड डिलिव्हरी बॉयने शोधून काढला. काही कुत्रे हे नाल्यात मानवी शरीर खात असल्याचे त्याला दिसले आणि त्याने तत्काळ पोलिसांना याबाबत सूचना दिली. सुरुवातीला दोन आरोपींनी कामाक्षिपाल्य पोलिसांकडे जाऊन आर्थिक वादातून रेणुकास्वामीची हत्या केल्याची कबुली दिली. तपासाचा उलगडा होताच, दर्शन आणि पवित्राचा सहभाग उघडकीस आला, ज्यामुळे त्यांना इतर ११ जणांसह अटक करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, रात्रभर दर्शनला व्हॉट्सॲपद्वारे काय घडत आहे, याची माहिती दिली जात होती, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी आरोपींचे कॉल डिटेल रेकॉर्ड जमा केले आणि त्यांच्या मोबाइलची तपासणी केली. ८ जून रोजी रात्रभर आरोपी दर्शनशी बोलल्याचे पोलिसांना आढळले.
दर्शन आणि पवित्राला अटक
दर्शन थुगुडेपा आणि पवित्रा गौडा यांना मंगळवारी म्हैसूर येथील दर्शनच्या फार्महाऊसमधून अटक करण्यात आली आणि चौकशीसाठी बेंगळुरूला आणण्यात आले बुधवारी दर्शन आणि पवित्रा गौडा यांना पोलिसांनी पट्टणगेरे येथील एका शेडमध्ये घटनास्थळावरील प्रत्यक्ष चौकशीसाठी आणले होते. दर्शन, पवित्रा आणि अन्य आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींची चौकशी करत त्यांचे जबाब नोंदवत असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. सध्या फरार असलेल्या आणखी चार संशयितांचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पवित्रा गौद्रा, दर्शन थुगुडेपा, पवन, राघवेंद्र, नंदिश, विनय, नागराजू, लक्ष्मण, दीपक, प्रदोष, कार्तिक, केशवमूर्ती, निखिल नायक, जगदीश, अनु, रवी आणि राजू अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.