कंगना रनौतने आज आपल्या कू या सोशल मीडियावरून एक नवीन माहीती चाहत्यांना दिली आहे. सध्या कंगना इमर्जन्सी या चित्रपटाच्या तयारीत आहे. इन्स्टाग्रामवर तिने त्याबद्दलचे काही फोटो टाकले होते. आपण या फोटोतून कसे इंदिरा गांधी यांच्या भूमिकेसाठी तयार होत आहे हे ती सांगत होती. तिचे हे फोटो खूपच गाजले आहेत. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना कशी दिसेल याची वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. असं असतानाच कंगनाने आणखी एक धक्का दिला आहे.
कंगना रनौत आता इमर्जन्सी या चित्रपटासाठी दिग्दर्शनाची धुरा स्वत:च्या खांद्यावर घेणार आहे. यापूर्वी कंगनाने मणिकर्णिका या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता इंदिरा गांधी यांच्यावरच्या सिनेमाची धुराही तिने स्वत: आपल्याच खांद्यावर घ्यायचं ठरवलं आहे. याबद्दल कू वर लिहिताना ती म्हणते, मी आता पुन्हा दिग्दर्शनाची हॅट डोक्यावर घालायची ठरवलं आहे. जवळपास एक वर्षं या इमर्जन्सी चित्रपटावर मी काम करते आहे. त्यानंतर आता मी या निष्कर्षाला पोचले आहे की लेखक रितेश शाह यांचं लिखाण आता मी दिग्दर्शित करेन. हा प्रोजेक्ट घेतल्यामुळे मला अभिनयाच्या काही गोष्टींशी तडजोड करावी लागेल. पण मला ती मान्य आहे. हा सिनेमा एक उच्च कोटीचा सिनेमा होणार आहे. माझ्या अपेक्षा आता पुरेपूर उंचावल्या आहेत. हा सिनेमा मला वेगळ्या लीपमध्ये घेऊन जाईल.
रितेश शाह हे एक नावाजलेले लेखक आहे. त्यांनी आजवर लिहिलेल्या सिनेमांवर नजर टाकली तरी त्याचा अंदाज येतो. पिंक, कहानी, कहानी २, रॉकी हँडसम अशा सिनेमांचा त्यात समावेश होतो. सगळ्यात महत्वाची बाब अशी की कंगनाचा आगामी धाकड या सिनेमाचं लेखनही रितेश यांनीच केलं आहे. कंगना रनौतकडे सध्या अनेक चांगले सिनेमे आहेत. यापैकीच थलैवी आणि दुसरा धाकड आहे. बायोपिक करण्यासाठी कंगनाकडे आता अनेक निर्माते रांगा लावू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी विद्या बालनकडे बायोपिक क्वीन म्हणून पाहिलं जात होतं. आता त्या शर्यतीत कंगनाचा समावेश झाला आहे. थलैवी हा सिनेमा तर ती करते आहेच. आता इमर्जन्सी या चित्रपटातून ती इंदिरा गांधी यांना मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.
हे ही वाचा:
…तर स्कायवॉकलाही बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या
रिलायन्सकडून अक्षय ऊर्जेत मोठी गुंतवणूक
मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे
गेल्या काही दिवसांपासून कंगना रनौत सतत चर्चेत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगनाने सातत्याने बॉलिवूडमध्ये असलेल्या नेपोटिझमवर भाष्य केलं होतं. या इंडस्ट्रीत सुरू असलेल्या घराणेशाहीपासून या इंडस्ट्रीत बोकाळलेल्या अमली पदार्थ सेवनाबद्दल कंगना उघड बोलली होती. त्यामुळे ती चर्चेत आली. तिच्या या बोलण्यामुळे तिला येत्या काळात चित्रपट मिळतील की नाही याबद्दल शंका होती. पण तसं न होता कंगनाच्या खिशात सध्या अनेक मोठे चित्रपट आहेत. कंगनाला सातत्याने मिळणारे राष्ट्रीय पुरस्कार पाहता अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये कंगनाला घेण्याकडे निर्मात्यांचा कल असतो.