आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कार प्रदान केले आहेत. २०१९ साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सोमवारी दिल्लीतील पद्म पुरस्कार सोहळ्यात त्यांची मुलगी बान्सुरी स्वराज यांना हा पुरस्कार प्रदान केला.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हजेरी लावली होती. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते ऑलिम्पियन बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये संघाचे नेतृत्व करणाऱ्या महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना पद्मभूषण पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला.
प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित छन्नूलाल मिश्रा यांनाही पद्मविभूषण पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आला. तर गायक अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार २०२० मिळाला आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रानौत हिला गेल्या वर्षी प्रदान करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
डॉ रमण गंगाखेडकर, ICMRचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ, यांना पद्मश्री पुरस्कार २०२० देण्यात आला आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील एअर मार्शल डॉ. पद्मा बंदोपाध्याय यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९५४ मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०१४ पासून समाजासाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या अनेक “अपरिचित चेहऱ्यांना” पद्म पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे.
हे ही वाचा:
रुग्णालयांमधील आगींच्या घटनेत दीड वर्षात गेले ५१ बळी
एनसीबीने गोठवली १२ कोटींची मालमत्ता
पद्म पुरस्कारांद्वारे, सरकार एखाद्या क्षेत्रातील विशिष्ट कार्य जोखण्याचा प्रयत्न करते आणि कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी यासारख्या सर्व क्षेत्रांमध्ये किंवा शाखांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी किंवा सेवेसाठी दिले जाते.