५४ वर्षीय निनाद लोकूर काही दिवसांपूर्वीपासून आजारी होते. त्यांना सुरुवातीला कल्याण येथील सार्वजनिक रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना अवघ्या काही तासांतच ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हलवावे लागले. येथे दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांतच त्यांचा मृत्यू झाला.
तापाने आजारी असलेले लोकूर यांनी पॅरासिटामॉलचे औषध घेतले होते. पण त्यांचा अशक्तपणा आणखी वाढू लागला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. चाचण्या केल्या तेव्हा त्यांना डेंग्यू झाल्याचे आढळून आले. त्यांच्या प्लेटलेटची पातळीही १० हजारांच्या खाली गेली होती. ही अतिशय गंभीर पातळी मानली जाते. प्लेटलेटची संख्या १० हजारांच्या खाली घसरल्यास अंतर्गत रक्तस्राव टाळण्यासाठी ‘प्लेटलेट ट्रान्सफ्यूजन’ (रक्त संक्रमण) करावे लागते. त्यामुळे कुटुंबाला रक्तसंक्रमणाची आणि आयसीयूची आवश्यकता होती. त्यामुळे आयसीयूसाठी त्याला कळवा रुग्णालयात नेण्यास सांगितले होते. परंतु २४ तासांच्या आत, रविवारी दुपारीच मृत्यूने त्याला कवटाळले.
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कल्याण रुग्णालयात आयसीयू नसल्यामुळे लोकूर यांना हलवावे लागले. ‘आम्ही त्यांना कळवा किंवा शीव रुग्णालयात नेण्यास सांगितले होते,’ असे डॉक्टरांनी सांगितले. लोकुर कळवा रुग्णालयात पोहोचले, तेव्हा रात्रीचे ११ वाजले होते आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. निनाद हे त्यांच्या पत्नी आणि मुलीसोबत श्री कॉम्प्लेक्स, आधारवाडी, कल्याण येथे राहत होते. ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते आणि एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांची मुलगी पुण्यात शिकत आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून ‘विश्वकर्मा योजने’ची घोषणा !
आपला महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर
मेरे प्यारे परिवारजन… म्हणत पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासाचा लेखाजोगा मांडला
वृत्तवाहिन्यांच्या ‘बेताल’ बातम्यांमुळे तपासावर परिणाम
‘कळवा रुग्णालयात त्यांच्या भावाचा मृत्यू झाला, याबद्दल त्यांची तक्रार नाही, परंतु कल्याणच्या रुक्मिणीबाई रूग्णालयातील सुविधांच्या कमतरतेकडे सरकारने लक्ष द्यावे,’ अशी मागणी निनादचा भाऊ निरंजन याने केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने नुकतीच आयसीयू सुविधा उभारली आहे. मात्र विशेष कर्मचाऱ्यांअभावी दोन दिवसांतच ती बंद करण्याची वेळ रुग्णालय प्रशासनावर आली आहे.
कल्याणमधील आणखी एक रहिवासी ललिताई चौहान (४२) यांना सुरुवातीला डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर ९ ऑगस्टला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कळवा रुग्णालयाने निष्काळजीपणा केला, रुग्णाला पुरेसे उपचार दिले नाहीत, असा चौहान कुटुंबीयांचा आरोप आहे. कुटुंबीयांनी डॉक्टर आणि परिचारिकांच्या विरोधात चौकशीची मागणी केली आहे.
ज्या १८ जणांचा कळव्यातील रुग्णालयात मृत्यू झाला, त्यात ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चेतक गोडे नावाच्या चार वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. हे थंड पेय आहे, असे समजून मुलाने घरातील बाटलीत ठेवलेले रॉकेल चुकून प्यायले होते. याप्रकरणी स्थानिक कळवा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शहापूरला सरकारी आरोग्य सुविधा असूनही विशेष डॉक्टरांची कमतरता आहे. ज्या रुग्णांकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे, त्यांना उपचारासाठी ५० किमी दूर असलेल्या कळवा रुग्णालयात नाही तर तब्बल ८५ किमीचा प्रवास मुंबईत धाव घ्यावी लागते.