बाहुबली फेम प्रभासचा काल्की २८९८ एडी हा चित्रपट जगभरात चांगली कमाई करू लागला असून पौराणिक कथेचा बाज असलेल्या या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने जागतिक स्तरावर १९१.५ कोटींची कमाई केली असून गेल्या दोन दिवसांत या चित्रपटाने २९८ कोटी कमावले आहेत.
गेल्या काही वर्षांत पौराणिक कथा, पात्रे यांचा आधार घेत अनेक चित्रपट तयार केले जात असून त्यांना लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे. बाहुबली हा चित्रपट काही वर्षांपूर्वी येऊन गेला. त्याला अफाट लोकप्रियता लाभली. त्यात भारतीय संस्कृती, परंपरा, कला यांना प्राधान्य देण्यात आले होते. आरआरआर या चित्रपटातही प्रभू श्रीरामाच्या धर्तीवर पात्ररचना करण्यात आली होती. त्यालाही लोकांनी डोक्यावर घेतले.
प्रभाससह सुपरस्टार अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, शाश्वत चॅटर्जी, कमल हासन यांच्या भूमिका या चित्रपटांत आहेत.
पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात ९५.३० कोटींची कमाई केली होती. सॅकनिल्कच्या अहवालानुसार दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने भारतात ५४ कोटींची कमाई केली.
वैजयंती मूव्हीजच्या चित्रपटासाठी ६०० कोटींचा खर्च करण्यात आला आहे. संतोष नारायण यांचे संगीत या चित्रपटाला लाभले आहे. जॉर्जी स्टॉइलीकॉविच यांची सिनेमॅटोग्राफी या चित्रपटात असून संकलन कोटागिरी वेंकटेश्वर राव यांचे आहे.
२७ जूनला हा चित्रपट जगभरात रीलिज झाला. काल्कीच्या टीमने एक्सवर या चित्रपटाच्या कमाईविषयी माहिती दिली आहे. त्यात गेल्या दोन दिवसांत २९८ कोटींची कमाई केल्याचे म्हटले आहे. भारतात या चित्रपटाने १४९.३ कोटींची कमाई केल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
योगी सरकारचा निष्क्रिय अधिकाऱ्यांना दणका!
लडाखमध्ये रणगाडा सरावावेळी भारतीय सैन्याच्या पाच जवानांना हौतात्म्य !
‘दिल्लीच्या विमानभाड्यात असामान्य वाढ करू नका’
बिहारमध्ये ११ दिवसांत पाच पूल कोसळले
सुपरस्टार रजनीकांत यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहे.रजनीकांत यांनी हा चित्रपट नुकताच पाहिला आणि त्याविषयी एक्सवर लिहिले की, मी काल्की पाहिला. एक उत्कृष्ट चित्रपट आहे. दिग्दर्शक नागअश्विन यांनी हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. प्रभास, अमिताभ, कमल हासन, दीपिका पदुकोण यांचेही रजनीकांत यांनी अभिनंदन केले आहे.
काल्की २८९८ एडी हा चित्रपट विज्ञान आणि पौराणिक कथा यांची सांगड आहे. महाभारतानंतर ६००० वर्षांच्या काळातील हा चित्रपट दाखविण्यात आला आहे. अमिताभने अश्वत्थामाची भूमिका केली असून दीपिका सुम ८० या भूमिकेत आहे. तर कमल हासन यांनी सुप्रीम यास्किन ही भूमिका केली आहे.