वारकऱ्यांना आषाढीवारीचे वेध लागलेले असतांनाच त्याचा अनुभव आतापासूनच देणारा एक कार्यक्रम नुकताच डोंबिवलीत पार पडला. आषाढीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘कैवल्यवारी’ या वारीच्या प्रवासावर आधारित भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला डोंबिवलीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात जमलेला रसिक विठ्ठल भक्तीमध्ये चिंब भिजला होता. श्रिया क्रिएशन आणि वायर्ड एक्सप्रेशन निर्मित या कार्यक्रमात पंडित आनंद भाटे यांनी दिवेघाटाचे वर्णन करणारे चालू सोबतीने वाट चढू अवघड दिवेघाट यासोबतच ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हे गीत सादर केलं. सावनी शेंडे यांनीही अतिशय बहारदार गायन करत मैफिलीत रंग भरला तो ‘अवघा रंग एक झाला’ या गाण्यातून. याशिवाय विलास कुलकर्णी आणि अवधूत गांधी यांनी गायलेल्या ‘कानडा राजा पंढरीचा’ या गाण्याने रसिकांची मने जिंकली. यासोबतच विलास कुलकर्णी यांनी कैवल्यवारी या अल्बम मधील येतो ‘परतुनी देवा, माझी आठवण ठेवा’ हे विठ्ठल भेटीनंतर त्याचा निरोप घेतानाचे गीत सादर केले. कार्तिकी गायकवाड हिने गवळण आणि काही संत रचना सादर करुन रसिकांची दाद मिळवली.
या कार्यक्रमात डॉ वृषाली दाबके आणि त्यांच्या शिष्यांनी मिळून कैवल्यवारीतील काही गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्याविष्कार सादर केले. या नृत्याविष्काराने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कैवल्यवारीतील सर्व गाणी वर्षा राजेंद्र हुंजे यांनी लिहिली आहेत. याच कार्यक्रमात चित्रकार उमेश पांचाळ यांनी एकीकडे भक्तिगीते सादर होताना त्याचवेळी विठ्ठलाचे अप्रतिम लाइव्ह पेंटिंग काढले. कैवल्यवारीचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी ११ प्रयोग करण्याचे नियोजन असल्याचे आयोजकांनी सांगितले.