पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी (१४ एप्रिल) संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हरियाणाच्या दौऱ्यावर होते. त्यांनी हिसार आणि यमुनानगर येथे सभा घेतल्या. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
खरं तर, कैथल जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रामपाल कश्यप यांच्यासाठी हा दिवस आयुष्यातला अविस्मरणीय क्षण ठरला. रामपाल कश्यप यांनी १४ वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत नाहीत आणि जोपर्यंत ते स्वतः पंतप्रधान मोदींना भेटत नाहीत तोपर्यंत ते बूट घालणार नाहीत. अखेर रामपाल कश्यप यांची प्रतिज्ञा आज पूर्ण झाली.
पंतप्रधान मोदींना हरियाणात आल्यानंतर रामपाल कश्यप यांच्याबद्दल माहिती मिळाली. यानंतर त्यांनी स्वतः रामपाल यांना भेटण्यासाठी बोलावले. या भेटीवेळी पंतप्रधान मोदींनी रामपाल कश्यप यांना बुटाची जोड भेट दिली आणि स्वतः त्यांच्या पायात बूट घातले. या वेळी पंतप्रधान मोदी भावुक झाल्याचंही पाहायला मिळाले. तसेच भविष्यात कधीही अशी शपथ घेऊ नका असे आवाहन देखील पंतप्रधान मोदींनी त्यांना केले.
हे ही वाचा :
मध्य प्रदेश: हिंदू धर्माच्या प्रभावामुळे अन्वरने इस्लाम सोडून स्वीकारला सनातन धर्म!
… अन् मोहित्यांना दिसला मोत्यांमध्ये राम
मुर्शिदाबादमधील हिंसाचार, मृत्यूंच्या चौकशीसाठी हवे विशेष पथक
मुझफ्फरनगर: तरुणीचा हिजाब उतरवायला लावून सोबतच्या हिंदू तरुणाला मारहाण
या भेटीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या भेटीदरम्यान रामपाल सांगतात, “मी १४ वर्षांपासून चप्पल घातलेली नाही, मी संकल्प केला होता की तुमच्यासमोरच पहिल्यांदा चप्पल घालीन.” त्यावर पंतप्रधान मोदी म्हणतात, “आज मी तुला बूट घालतो आहे, पण पुन्हा असा संकल्प करू नकोस. तुला काम करायचं आहे, स्वतःला का त्रास द्यायचा?”
यानंतर पंतप्रधान मोदी त्यांना बूट घालतात आणि विचारतात, “बुटं फिट बसली का?” आणि सांगतात, “आता बुटं घालूनच राहा.” यावर रामपाल उत्तर देतात, “माझ्या स्वप्नातही आले नव्हते की तुमचे प्रत्यक्ष दर्शन होईल.” यावेळी शेवटी व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी त्यांची पाठ थोपटताना दिसतात.
पंतप्रधान मोदींनी देखील हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “हरियाणातील यमुनानगर येथे आज कैथलच्या रामपाल कश्यपजी यांची भेट घेण्याचा योग आला. त्यांनी १४ वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की ‘मोदी जेव्हा पंतप्रधान होतील आणि मी त्यांना प्रत्यक्ष भेटेन, तेव्हाच बूट घालेन.’ आज मला त्यांच्या पायात बुट घालण्याचा योग आला. अशा सर्व सहकाऱ्यांच्या भावना मी मानतो, पण माझं आग्रहाचं सांगणं आहे की, त्यांनी अशा प्रकारचे संकल्प घेण्याऐवजी सामाजिक किंवा देशहितासाठी संकल्प करावेत.”