हिंद केसरी, समर्थ स्पोर्ट्स, संस्कृती प्रतिष्ठान, श्री साई क्रीडा यांनी ओम् श्री साईनाथ सेवा ट्रस्टने आयोजित केलेल्या द्वितीय श्रेणी पुरुष (स्थानिक) गट कबड्डीच्या दुसरी फेरी गाठली. प्रभादेवी समुद्र किनाऱ्या जवळील मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या स्पर्धेचा आज तिसरा दिवस. आज हिंद केसरीने चुरशीच्या लढतीत प्रॉमिस स्पोर्ट्सचा कडवा प्रतिकार ३४-३१ असा मोडून काढत आगेकूच केली. विश्रांतीला १७-१४ अशी आघाडी हिंद केसरीकडे होती. शेवटी तीच त्यांच्यासाठी उपयोगी ठरली. मंथन सावंत, जयवंत खरात, शुभम पेडणेकर या विजयाचे शिल्पकार ठरले. प्रॉमिस कडून रोहन कोलगे, विराज रेवाळे यांनी अखेच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली.
समर्थ स्पोर्ट्सने खडा हनुमानला ४२-११ असे सहज नमवित आपली घोडदौड सुरू ठेवली. मनोज गोरे, रुपी पाटील यांच्या चढाई-पकडीच्या झंजावाती खेळाने हा विजय सोपा केला. संस्कृती प्रतिष्ठानने गोल्फादेवीचे आव्हान ३४-२५ असे संपविले. पहिल्या डावात २३-०७ अशी आघाडी घेणाऱ्या संस्कृतीला दुसऱ्या डावात मात्र गोल्फादेवीने विजयासाठी चांगलेच झुंजविले. पण पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर प्रतिष्ठानने बाजी मारली. नीरज मोरे, रोशन राय, विनायक यादव प्रतिष्ठानकडून, तर सुशांत तांबडे, प्रशांत शिंदें गोलफादेवीकडून उत्तम खेळले.
हे ही वाचा:
शेवटच्या सामन्यात श्री साई मंडळाने वीर नेताजीला ३७-१८ असे सहज नमविले. पहिल्या सत्रात चुरशीने खेळलेल्या या सामन्यातील दुसऱ्या सत्रात श्री साईने जोरदार खेळ करीत सामना एकतर्फी केला. आकाश पाताडे, ओमकार पाटील,संदीप मालप यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. वीर नेताजीचा पवन चव्हाण चमकला.