महाराष्ट्राच्या मुलींनी ५०व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. तर मुलांना मात्र उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का. महाराष्ट्राच्या मुलींची उपांत्यपूर्व लढत गोवा संघाशी होईल. या संघात हरियाणाच्या खेळाडूंचा अधिक भरणा आहे.
भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने उत्तर प्रदेश राज्य कबड्डी असो.ने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. हरिद्वार येथील रोशनबाद बंदिस्त क्रीडा संकुलात झालेल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राच्या मुलींनी कुमारी गटात ३२-२८ असे नमवित आगेकूच केली. पहिल्या डावात अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघ १४-१४ अशा समान गुणावर होते. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने आपला खेळ उंचावत सामना आपल्या बाजूने झुकविला. भूमिका गोरेचा चतुरस्त्र खेळ तिला वैभवी जाधव, प्रतिक्षा लांडगे यांची दुसऱ्या डावात मिळालेली चढाई पकडीची साथ त्यामुळेच महाराष्ट्राने विजय मिळविला. बिहारच्या मुलींनी शेवटच्या क्षणापर्यंत कडवी लढत दिली.
हे ही वाचा:
हे होणारच होतं…ठाकरे-काँग्रेस ही खुर्चीसाठीचीचं युती होती!
सरपंच देशमुख हत्या प्रकरणी सातही आरोपींवर मोक्का!
कुमार गटात मात्र महाराष्ट्राला तामिळनाडू कडून ३२-३७ असा ५गुणांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवाने महाराष्ट्राचे या स्पर्धेतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. पूर्वार्धात चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात महाराष्ट्र १८-२० अशा २ गुणांनी पिछाडीवर होता. महाराष्ट्राच्या आफताब मंसूरे, जयंत काळे, समर्थ देशमुख यांनी उत्तरार्धात गुण घेण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण महाराष्ट्राचा बचाव या सामन्यात दुबळा ठरल्याने व संयम न राखता आल्याने त्यांना या निसटत्या पराभवाला सामोरी जावे लागले.