भारताच्या चांद्रयान- ३ या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून होते. या मोहिमेच्या यशासह भारताने नवा इतिहास रचत अंतराळ क्षेत्रात नवा टप्पा गाठला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इस्रोने तिरंगा फडकवला असून या भागात जाणारा भारत पहिला देश ठरला आहे.
चांद्रयान- ३ ने १४ जुलै २०२३ या दिवशी आपल्या चंद्राकडे जाणाऱ्या प्रवासाला सुरुवात केली होती. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचा ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान ४० दिवसांनी चंद्रावर पोहचले आहे. हा ४० दिवसांचा प्रवास अनेक टप्प्यांमधून होता.
चांद्रयान-३ चा ४० दिवसांचा प्रवास कसा होता?
- ५ जुलै – चांद्रयान- ३ ला अंतराळात नेणाऱ्या LVM- ३ रॉकेटशी जोडण्यात आलं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात प्रक्षेपणाची तयारी सुरू झाली.
- ६ जुलै – इस्रोने चांद्रयान- ३ च्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली.
- ११ जुलै – इस्रोकडून चांद्रयान- ३ प्रक्षेपणाची तालीम पूर्ण करण्यात आली.
- १४ जुलै – चांद्रयान- ३ चे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
- १५ जुलै – चांद्रयान- ३ योग्य कक्षेत पोहचले.
- १७ जुलै – चांद्रयान- ३ दुसऱ्या कक्षेत पोहचले.
- २२ जुलै – चांद्रयान- ३ ने चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
- १ ऑगस्ट – चांद्रयान- ३ ट्रान्सलुनर कक्षेत पोहोचले.
- ५ ऑगस्ट – चांद्रयान- ३ ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला.
- ६ ऑगस्ट – चंद्राचा पहिला फोटो पृथ्वीवर पाठवला. चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला.
- ९ ऑगस्ट – चांद्रयान- ३ चा चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश झाला.
- १० ऑगस्ट – चांद्रयान- ३ ने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो पाठवले.
- १४ ऑगस्ट – चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
- १६ ऑगस्ट – चंद्राची पाचवी आणि अंतिम कक्षा गाठली.
- १७ ऑगस्ट – चांद्रयान- ३ मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले.
- १८ ऑगस्ट – विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली.
- २० ऑगस्ट – डिबूस्टिंग प्रक्रियेद्रवारे विक्रम लँडरचा वेग कमी करण्यात आला.
- २१ ऑगस्ट – चांद्रयान- २ च्या ऑर्बिटर आणि चांद्रयान- ३ चा एकमेकांशी संपर्क झाला.
- २३ ऑगस्ट – चांद्रयान- ३ संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.