काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकारांविरुद्ध अपमान जनक वक्तव्य केले आहे. ‘पत्रकार हे मालकांचे गुलाम आहेत, त्यांच्याविरुद्ध काही करू शकत नाहीत,’ असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शनिवारी (१६ नोव्हेंबर) अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी हे वक्तव्य केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख नेत्यांच्या राज्यभर सभा पार पडत आहेत. याच अनुषंगाने मिडिया देखील सर्व नेत्यांच्या प्रचारसभा, बैठका, परस्पर भेटून मुलाखती कवर करण्याचे काम करत आहे. मात्र, मिडीयावाले सर्व दाखवत नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
ते पुढे म्हणाले, जेव्हा मी बोलतो की ते त्यांचे आहेत, तेव्हा ते (पत्रकार) माझाकडे बघून हसतात आणि ते म्हणतात हो आम्ही त्यांचे आहोत. यामध्ये यांची चुक नाही, यांना काम करायचे आहे, पगार घ्यायचे आहे, यांना आपल्या मुलांचे शिक्षण करायचे आहे, यांना जेवण जेवायचे आहे, त्यामुळे हे मालकांविरुद्ध काही करू शकत नाहीत, एक प्रकारचे हे गुलाम आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.
हे ही वाचा :
वाँटेड तस्कर हाजी सलीमच्या सिंडिकेटशी संबंधित चार हजार किलोग्राम अंमली पदार्थ जप्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नायजेरियात स्वागत
दरम्यान, राहुल गांधींच्या वक्तव्याने अपमान झाल्याचे महाराष्ट्र संपादक पत्रकार परिषदेने म्हटले आहे. याबाबत परिषदेने पत्रक काढले आहे. पत्रकारांचा पाणउतारा करणे हे चुकीचे आहे, असे परिषदेने म्हटले आहे. महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देखील राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.